जिल्हा परिषदेच्या औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबीत
औषध रेकॉर्ड मध्ये आढळली तफावत
वर्धा : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत असलेल्या औषध भांडाराचे मुख्य औषध निर्माण अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले असल्याची घटना वर्धा जिल्हा परिषदेत घडली आहे. 5 मार्च रोजी सायंकाळी ही तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. औषध निर्माण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसचे समाधानकारक उत्तर देऊ शकले नसल्याने हे निलंबन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या तात्काळ निलंबनाने जिल्हा परिषदेत खळबळ निर्माण झाली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये या निलंबनाची चर्चा होऊ लागली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी औषध भांडराला अचानक भेट दिली. यावेळी भेटीदरम्यान भांडारात अत्यावश्यक औषध यादी, मुदतबाह्य औषधें अत्यंत कमी कालावधीची असण्यासारख्या बाबी समोर आल्या होत्या. त्यामुळे औषध निर्माण अधिकारी सोज्वल उघडे यांना 18 फेब्रुवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला होता. त्याबाबत उघडे यांच्याकडून 27 फेब्रुवारी रोजी खुलासा करणारे पत्र देखील देण्यात आले. परंतु सादर केलेल्या खुलास्यामध्ये एसेनशील मेडिसिन लिस्ट उपलब्ध करून न देणे, मागणी नसताना अनावश्यक औषधी साहित्य पुरवठा करणे, प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी दिनांक व पुरवठा दिनांक यात तफावत असणे, या बाबीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतले होते. त्याबाबत खुलासा मागविला पण त्यात ठोस कारणे व पुरावे औषध निर्माण अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आली नाही.
पुरावे सादर करू शकले नसल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तवणूक) नियम 1967 मधील नियम 3 चा भंग केल्याचे कारण यात समोर आले. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 च्या तरतुदी नुसार औषध निर्माण अधिकारी सोज्वल उघडे यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना कोणताही व्यवसाय करता येणार नाही. निलंबन काळात प्राथमिक आरोग्य केंद्र सिंदी रेल्वे येथे मुख्यालयी त्यांना राहावे लागणार असल्याचा आदेश काढण्यात आला आहे.
औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या अशा तडकाफडकी निलंबनाने जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांमध्ये मोठी चर्चा रंगली असून अनियमितता व शिस्त न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
Post Views: 171