गांधी – विनोबांच्या दर्शनाने होणार महात्मा गांधी साहित्य नगरीत प्रवे
वर्धा – वर्ध्यातील साहित्य संमेलनात प्रवेश करताना बारकावे टिपत साहित्यासोबतच कला – कुसर देखील अनुभवायला मिळणार आहे. संमेलन स्थळ असणाऱ्या महात्मा गांधी साहित्य नगरीत प्रवेश करताना महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या वैचारिक दर्शनाने साहित्य प्रेमी पुढे सरकणार आहे.
वर्ध्यात 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साहित्य संमेलन वर्ध्यात होत आहे त्यामुळे संमेलन स्थळ जाहीर झाल्यापासून या संमेलनाबाबतची उत्सुकता महाराष्ट्रातील साहित्य प्रेमींपासूनच वर्धेकरांना देखील लागली आहे. संमेलनाला गांधी-विनोबांच्या साहित्याचा स्पर्श असावा असाच आग्रह वर्ध्यातील साहित्यिकांसह वर्धेकरांनी देखील धरला होता. वर्धा ही महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिल्याने हा आग्रह स्वाभाविक देखील आहे. तेच ओळखून साहित्य संमेलन स्थळाला महात्मा गांधी साहित्य नगरी असे नाव देण्यात आले. या साहित्य नगरीत प्रवेश करताना प्रवेश द्वारावर महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचे दर्शन होणार आहे. या दोन्ही महात्म्यांच्या विचारांची थीम असणारे प्रवेश द्वार या साहित्य नगरीला उभारले जाणार आहे.
महात्मा गांधी साहित्य नगरीला असणारे प्रवेशद्वार वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. त्याचे डिझाइन तयार करण्यासाठी उपअभियंता महेश मोकलकर विशेष प्रयत्न करीत आहे. गांधी-विनोबा विचारातून, साहित्यातून आणि प्रतिकृती मधून तर भेटतातच. पण त्याहीपेक्षा ते आपल्या कल्पकतेमधून साहित्य नगरीत पोहचणाऱ्यांना कसे भेटतील यासाठी संपूर्ण टीम कार्य करीत आहे. साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते, कवी संजय इंगळे तिगावकर, लेखक राजेंद्र मुंडे यांच्यासह विविध साहित्यिक आणि संघटना यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ठोस निर्णय घेतले जात आहे.
मुख्य प्रवेशद्वार हे बांबू आणि लाकडी बल्ली चा वापर करून उभारले जाणार आहे. त्यासाठी विशिष्ट बांबू मागविण्यात आले आहे. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या प्रतिकृती या प्रवेशद्वारावर असणार आहे. याशिवाय वैशिष्ट्य म्हणजे माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधी यांचे पुस्तक तर आचार्य वोनोबा भावे यांचे गीताई हे पुस्तक देखील या प्रवेशद्वारावर प्रतिकृती च्या रुपात कोरले जाणार आहे. येणाऱ्याचेही लक्ष वेधून घेतील असेच हे प्रवेशद्वार उभारले जाणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. 80 बाय 30 आकाराचे हे प्रवेश द्वार आकर्षण ठरणार आहे.
पुस्तकातून ग्रंथ दालनात प्रवेश
– स्वावलंबी मैदानात उभारण्यात आलेल्या ग्रंथ दालनाचे भव्य रूप मैदानावर उभारलेल्या स्वरूपाने आत्ताच ग्रंथ दालनाची व्याप्ती सांगणारे आहे. त्यामुळे ग्रंथ दालन हे संमेलन स्थळाचे विशेष आकर्षण असणार आहे. तब्बल 291 दालने राहतील अशी ग्रंथ दालन परिसराची व्याप्ती आहे. चहुबाजूंनी टिन पत्रांनी बंदिस्त करून हा मोठा परिसर उभारण्यात आला आहे. या परिसराचे प्रवेशद्वार देखील तेवढेच आकर्षक आणि वैचारिक असावे अशीच संकल्पना तयार करण्यात येत आहे. प्रवेशद्वाराला पुस्तकाचे रूप देण्यात येत असून प्रवेश द्वार हे जणू पुस्तकाची प्रतिकृतीच असणार आहे. जसे पुस्तक उघडतात तसे हे प्रवेशद्वार असल्याने पुस्तकातून ग्रंथ दालनात प्रवेश होणार असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या प्रवेशद्वाराचा आकार साधारण 65 बाय 22 असा राहील.


