वर्धा : सेवाग्राम येथे झालेल्या सर्वोदय समाज संमेलनात लोकतंत्र वाचविण्यासाठी सदैव पुढाकार घेण्याचा संकल्प करणारा ठराव पारित करण्यात आला. संमेलन आणि सर्वोदय समाज लोकतंत्र, संविधान व धर्म निरपेक्षता वाचविण्याकरिता प्रत्येक संघर्षात सहभागी व पुढाकार घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. चिन्मय मिश्र यांनी या ठरावावर निवेदन केले. तर या प्रस्तावावर सर्वांचे एकमत झाले. यावेळी मंचावर जेष्ठ गांधीवादी तथा सर्व सेवा संघाचे अध्यक्ष अमरनाथ भाई, विद्यमान अध्यक्ष चंदन पाल, गांधीवादी अशोक भारत, सेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्ष आशा बोथरा, गांधीवादी गौरांग महापात्रा, चिन्मय मिश्र, अविनाश काकडे, विदर्भ भूदान मंडळाचे एकनाथ डगवार, सर्व 22 राज्याचे सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष मंचावर उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय भाषणात पूर्व अध्यक्ष अमरनाथभाई यांनी आजच्या सत्तेतील लोकांना लोकतंत्र पाहिजे आहे पण ते केवळ साइन बोर्डच्या रुपात हवे आहे. प्रत्यक्ष लोकतंत्र यांना नको आहे. इतिहासातील त्यावेळच्या घोषित आणि बाणी पेक्षा आजची अघोषित आणीबाणी खतरनाक आहे. अलीकडे झालेल्या राहुल गांधी यांच्या पदयात्रेनंतर आता थोडाफार फरक पडायला लागला आहे. हा फरक सरकारलाही पडला आहे. पद यात्रेनंतर परिवर्तन पाहायला मिळते आहे. लोक बोलायला लागले आहे. लिहायला लागले आहे. देश आणि दुनिया संकटात आहे, युक्रेन हे त्याचे उदाहरण आहे. यात कुणी इतर देश बोलायला तयार नाही, दुनियेची पंचायत शांत आहे. असे अमरनाथ भाई यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, विनोबाजींनी जय जगत दिले आहे. शेजारी देशांशी मैत्री वाढविली जात आहे. पण यात शेजारधर्म असेल तरच चांगली मैत्री निर्माण होऊ शकते. दुनिया शेजारी झाली आहे पण शेजारधर्म विसरली आहे. शेजारधर्म हा विज्ञानाच्या नाही तर अध्यात्माच्या आवाक्यातील आहे. त्यावेळी विनोबा म्हणाले होते की, ‘विज्ञान अध्यात्मासोबत जाईल तर सर्वोदय होईल पण राजनीती सोबत गेले तर सर्वनाश होईल.’ आज ही स्थिती दिसून येत आहे असे त्यांनी सांगितले.
वर्तमानात दोन आह्वान समोर आलेली आहे. एक सत्तेतून मुक्त होने आणि गांधीच्या स्वप्नाचा समाज बनवणे. या आव्हानाना पेलत गांधीच्या वर्ग निराकरणाचा मार्ग घ्यावा लागेल. ग्रामसभा, ग्रामकोश, शांतीसेना, सर्वसहमतीने निर्णयाच्या प्रक्रियेतून अहिंसक समाजाची निर्मिती होऊ शकते असे मत अमरनाथ भाई यांनी व्यक्त केले.

संमेलन संयोजक प्रा. सोमनाथ रोडे यांनी तीन दिवसाच्या संमेलनाचा आढावा सादर केला आहे. वर्तमान परिस्थितीत जे सांप्रदायिक, धार्मिक संक्रमण होत आहे, त्याबाबत चिंता या संमेलनात व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी सेवाग्राम आश्रमच्या आशा बोथरा यांनी, सेवाग्राम हे प्रेरणास्थळ आहे. सर्वोदय म्हणजे अवयवाचे संयुक्त रूप होय. यातून मानसिक स्वस्थता कशी टिकून राहणार? याबाबत सर्वोदय समाजाने कार्य करण्याची गरज आहे, असे सांगितले.
तारा गांधी यांनी आंतरिक हिंसा कमी करण्याचे आवाहन केले.
मध्य प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष चिन्मय मिश्र यांनी या सर्वोदय संमेलनाचे निवेदन सादर केले. या निवेदनात हे संमेलन या गोष्टीकरिता कटिबद्ध आहे की लोकतंत्र, संविधान व धर्म निरपेक्षता वाचविण्याकरिता प्रत्येक संघर्षात सहभागी व पुढाकार घेण्याचा संकल्प करते असा प्रस्ताव मांडण्यात आला आणि तो सर्वानुमते स्वीकारण्यात आला आहे.
समापन सत्राचे संचालन अशोक भारत यांनी केले तर आभार अरविंद कुशवाह यांनी केले. 22 राज्यातील 1200 प्रतिनिधी या संमेलनात सहभागी झाले होते. त्यात महाराष्ट्रतील 400 सर्वोदयी व गांधीवादी कार्यकर्ते सहभागी झालेत 30 टक्के युवकांचा सहभाग हे या संमेलनाचे वैशिष्ट्य होते.


