वर्धा : विविध कारणांमुळे दिड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहेय.वर्ध्याच्या सात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वर्ध्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. यावेळी बाजार समित्यांवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपने देखील मैदानात उतरण्याची तयारी केली आहे तर काँग्रेसही बाजार समितीवर डोळा ठेऊन आहे. पण तिन्ही राजकीय पक्षात असणाऱ्या गटा-तटाच्या राजकारणामुळे हिंगणघाट, आर्वी, सिंदी रेल्वे, वर्धा, आर्वी , आष्टी आणि समुद्रपूर या बाजार समित्यांवर वर्चस्वाची लढत सुरू झाली आहेय. येथे एकूण 475 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.

वर्ध्यात सात बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून सात बाजार समितीवरील 126 संचालक पदाकरिता 28 एप्रिल रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेय. निवडणूक पक्षाच्या चिन्हावर होणार नसली तरीही विविध राजकीय पक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपला झेंडा रोवण्याचा प्रयत्न करीत आहेय. नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली असून 126 जागांसाठी 475 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहे. चुरशीच्या ठरणाऱ्या या निवडणुकांमध्ये सर्वांचे लक्ष विदर्भात सर्वात मोठ्या असलेल्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे लागले आहे. यावेळी ग्राम पंचायत सरपंच आणि सदस्य देखील मतदान करू शकणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या या निवडणुकीत रंगत आली आहे.

हिंगणघाट या विदर्भातील सर्वात मोठ्या बाजार समितीवर आत्तापर्यत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर कोठारी अध्यक्ष राहिले आहे. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी अर्ज दाखल करून पॅनलच रिंगणात उतरविण्याची तयारी केलीय. त्यामुळे सुधीर कोठारी भाजप आमदार समीर कुणावर यांच्यासोबत जाणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच सुधीर कोठारी यांनी ही पक्षाच्या चिन्हांची लढत नसल्याचे सांगून कुणावर यांच्या सोबत राहण्याचाच इशारा दिला आहे.
सिंदी रेल्वे, आर्वी आणि पुलगाव येथील बाजार समित्यांवर आपलेच संचालक निवडून आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. येथे काँग्रेस देखील आपले भाग्य अजमावणार आहे. काँग्रेसचे शेखर शेंडे, आमदार रणजित कांबळे, आमदार अमर काळे हे नेते कामाला लागले आहे.
शेतकरी हिताच्या मुद्द्यांना घेऊन रिंगणात उतरणाऱ्या पॅनललाच मतदार या निवणुकीत पसंती देणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती नामांकन दाखल –
पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती- 94 अर्ज
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती- 73 अर्ज
आष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती – 61अर्ज
सिंदी रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती- 70 अर्ज
आर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती- 65 अर्ज
समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती -48 अर्ज
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती- 64 अर्ज
एकूण – 475


