वर्धा : उन्हाळ्याच्या सुरुवतीलाच हिंगणघाट येथे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंगणघाटच्या अनेक भागात पाणीटंचाई आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढून नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. कोट्यवधी रूपयांचा खर्च करून योजना तयार झाल्या. योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्यानेच पाणी मिळत नाही, हिंगणघाट शहरात अमृत योजना झाली असतानाही पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.

365 दिवसाचा कर घेत असताना वर्षातून केवळ 140 दिवसच पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस सह शहरातील नागरिकांनी केला आहे. शहरात निर्माण करण्यात आलेल्या 11 पाण्याच्या टाक्यामधून पाणी पुरवठा होत नाही. टाक्या अजूनही कोरड्या असल्याचे मोर्चातून प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिंगणघाट शहरात मोर्चा काढण्यात आला. चक्क टँकरवर बसून आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल वांदिले यांनी केले.

नगरपालिका प्रशासनाचा निषेध करत राष्ट्रवादी काँगेस पक्षाकडून हिंगणघाट शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी चक्क टँकर वर बसून नगर पालिका प्रशासन व भाजप सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. हिंगणघाट शहरातील प्रमुख मार्गाने हा मोर्चा नगरपालिकेत धडकला. दीडशे कोटी रुपयांच्या अमृत योजनेअंतर्गत मोठा भ्रष्टाचार झाला असून नव्याने उभारण्यात आलेल्या अकरा टाक्याच्या माध्यमातून ताबडतोब पाणीपुरवठा सुरू करावा व जनतेची तहान भागवावी अशी मागणी यावेळेस मोर्चातून करण्यात आली. हिंगणघाट शहरातील संत ज्ञानेश्वर वार्ड, रामनगर वार्ड ,संत तुकडोजी वॉर्ड, शहा लंगडी रोड, रिठे कॉलनी या परिसरामध्ये पाणीटंचाई भासत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवाकर गमे , प्रशांत घवघवे, दशरथ ठाकरे, जावेदभाई मिर्झा, बबलू शेख, मंगेश गिरडे,
अमोल बोरकर , सुनील भुते, अमोल त्रिपाठी, प्रशांत लोणकर , शुभाष चौधरी, किशोर चांभारे, प्रल्हाद तुळाले, प्रा. गोकुळ टिपले गुरुजी, परम बावणे, शरद कुलसंगे, गजू चिडे, कविता मुंगले, सुचिता सातपुते, शबनम कुरेशी आदीसह अनेक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक सहभाागी झाले होते.


