कापसाचे भाव घसरवण्यास जबाबदार कोण?
शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांशी वाद; दोन दिवसासाठी देवळी बाजार समिती बंद
वर्धा: शासनाने हमीभाव ठरवून दिले असतानाही खरेदी ही हमीभावापेक्षाही कमी दरात केली जात आहे. व्यापाऱ्यांकडून तब्बल पाचशे ते सातशे रुपयांच्या तुटीवर कापूस खरेदी केला गेला. त्यामुळे देवळी येथील कृषी उत्पन्न समितीच्या यार्डात शेतकरी आणि व्यापारी यांच्यात मंगळवारी शाब्दिक वाद उफाळला होता. काही काळ लिलाव बंद राहिले, व्यापाऱ्यांची अडचण निर्माण होत असल्याने दोन दिवस बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीमध्ये कापूस खरेदी शक्य नसल्याने गुणवत्तेच्या आधारावर देवळी कापूस खरेदी करण्यात आली. सीसीआय खरेदी दरम्यान जाचक अटी लादल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला गेला. सीसीआय ने शेतकऱ्यांचा सातबारा, पेरापत्रक तसेच ऑनलाइनची अट टाकली आहे. कापसाच्या सुपर ग्रेडला सहा हजार 920 रुपयांचा भाव दिला गेला, तर काही शेतकऱ्यांना याहीपेक्षा कमी भाव देण्यात आला. त्यामुळे देवळीच्या यार्डात शेतकरी संतप्त झाले. देवळी येथे आतापर्यंत पावणेतीन लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. अलीकडे शासनाने जे व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. यावर मात्र व्यापाऱ्यांनी डोके चालवत शेतकऱ्यांकडून हमीपत्र लिहून घेत कमी भाव मिळण्यासाठी आपली कुठलीही हरकत नसल्याची हमी या पत्रातून लिहून घेतली जात असल्याचे समोर आहे. व्यापाऱ्यांचा गुन्हे दाखल करणे या शासनाच्या भूमिकेला विरोध आहे. देवळी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये अवाक जास्त झाल्याने माल ठेवायला जागा नसल्याचे कारण समोर करण्यात येऊन बाजार समिती दोन दिवसासाठी बंद ठेवण्यात आली आहे. हेच चित्र जिल्ह्यात देखील आहे. पण नेमके बाजार बंद ठेवण्याचे करण काय? याचा शोध घेतला असता शासनाने व्यापाऱ्यांना दिलेला इशारा हेच नेमके यामागचे कारण असल्याची बाब समोर आली आहे.



