संभाव्य उमेदवार जाहीर करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी हिरवी झेंडी दिल्याची जिल्हा कार्यकारीणीची पत्रकार परिषदेत माहिती
प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या नावाची घोषणा
वर्धा : वर्ध्यात वंचित बहुजन आघाडीने वर्धा लोकसभेच्या संभाव्य उमेदवाराबाबत घोषणा केल्याने वंचित आणि महाआघाडी यांच्यातील तिढा चर्चेत आला आहे.वर्धा जिल्हा कार्यकारिणीत ठराव घेऊन प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्ह्णून घोषणा करण्यात आली आहे. वर्धा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत प्राचार्य राजेंद्र साळुंखे यांचे नाव उमेदवारीबाबत पक्के करण्यात आले असून याची जाहीर घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. एकीकडे महाविकास आघाडीचा तिढा सुटला नाही, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्हा कार्यकरिणीला संभाव्य उमेदवार घोषित करण्यासाठी हिरवी झेंडी दिली आहे. वर्धा जिल्ह्यात लोकसभा उमेदवार घोषित केल्याने सध्या राजकीय खळबळ उडाली आहे. वंचितचे जिल्हाध्यक्ष मनोज वरखेडे, उपाध्यक्ष सुभाष खंडारे यांनी उमेदवाराची घोषणा केल्याने आता चर्चा वाढली आहे. आता यावर महाविकास आघाडी काय भूमिका घेते ते पाहणे महत्वाचे आहे.
स्थानिक शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज वरखेडे, उपाध्यक्ष डॉ. सुभाष खंडारे, प्रा. राजेंद्र साळुंखे हे उपस्थित होते. महाविकास आघाडी सोबत जाण्याची चर्चा सुरू आहे, पण अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. ऐनवेळी जर महाविकास आघाडीत मित्र पक्षसोबत युती झाली नाही तर काय? असा प्रश्न जिल्हा कार्यकारिणी समोर होता. प्राध्यापक राजेंद्र साळुंखे हे अर्थशास्त्र या विषयाचे प्राध्यापक असून ते निवृत्त झाले आहे, सामाजिक प्रश्नांची त्यांना जाण आहे. समाजाशी नाळ आणि वंचितांच्या समस्या निराकरण करण्याचे उमेदवारात सामर्थ्य असले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे त्यानुसार आम्ही उमेदवाराची निवड केली आहे असे डॉ. सुभाष खंडारे यांनी पत्रकार परीषदेत सांगितले. या संभाव्य उमेदवाराच्या घोषणेचे पत्र देखील काढण्यात आले आहे. आम्ही आमच्या उमेदवाराचा एबी फॉर्म देखील भरू असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना खंडारे म्हणाले की, बाळासाहेब आंबेडकर यांची आम्ही भेट घेतली, या भेटीत वर्ध्याच्या लोकसभा उमेदवार याबाबत आम्ही चर्चा केली, त्यांनी नावाची घोषणा करण्यासाठी आम्हाला हिरवी झेंडी दिली आहे त्यामुळे आम्ही नाव घोषित करीत आहे असे सांगितले.