महाविकास आघाडीत अग्रवाल, कराळे यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच

वर्धा : महाविकास आघाडीत उमेदवार कोण? याबाबत अनिश्चितता कायम असताना शेतकरी नेते शैलेश अग्रवाल, खदखद मास्तर नितेश कराळे आणि हर्षवर्धन देशमुख ही नावे चर्चेत आली आहे. देशमुख हे पूर्वीपासून निवडणूक लढण्यास फारसे उत्सुक नसल्याचे बोलले जात आहे तर नितेश कराळे आणि शैलेश अग्रवाल यांच्यात आता उमेदवारीसाठीची स्पर्धा सुरू आहे. मतविभाजनात तेली – कुणबी असा तिढा वर्ध्यात असताना जर शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी दिली तर या संघर्षाला विराम मिळू शकतो. शैलेश अग्रवाल हे सर्वसमावेशक उमेदवार ठरू शकतात. विधानसभेत भाजपच्या बाबतीत हिंगणघाट येथे हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. समीर कुणावार यांना जातीय आधार नसताना मतदारांनी निवडून दिले आहे. तर नितेश कराळे हे उमेदवारी मिळण्यासाठी कस लावत आहे. पण शरद पवार यांनी कामाला लावलेल्या माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी सिल्व्हर ओकवर पवार साहेबांना आपण निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
वर्धा लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला आहे, आपल्यापुढे कुठलेही मोठे आव्हान नाही, असा आत्मविश्वास उमेदवारी घोषित झाल्यावर खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला आहे. तर महाविकास आघाडीमध्ये अद्याप उमेदवाराची घोषणा झाली नाही, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी वर्ध्यात कामाला लागा असा आदेश दिल्यावर माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी वर्ध्यात बैठकांचे सत्र राबविले. जनसंपर्क देखील वाढविला पण त्यांनी केलेल्या चाचपणीनंतर आपलेच आपल्याला साथ देणार नाही! अशा निर्णयापर्यंत ते आले असल्याने सिल्व्हर ओक वर निवडणूक लढण्यासाठी अनिश्चितता व्यक्त केली आहे. सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेऊन हर्षवर्धन देशमुख यांनी माघार घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबत त्यांच्याकडून सत्य काय? हे जाणून घेण्यासाठी फोनवर सम्पर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण सम्पर्क होऊ शकला नाही.



