वर्धा – मानवी देह मृत झाल्यावरच त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना आपण समाजात पाहिले आहे. पण हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे मात्र गोपालकाने आपल्या गाईच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करीत पशुप्रेम दाखविले आहे. तब्बल तीस वर्षांपासून जोपासना करीत असलेल्या गाईचा मृत्यू झाला. गाईच्या मृत्यूनंतर तिच्यावर मानवी देहाप्रमाणेच अंतिम संस्कार करण्यात आले आहे.

बऱ्याचदा पशुपालकांकडून गुरं कसायला विकण्यासारख्या घटना घडतात. पण अशा घटनांना थांबविण्याची प्रेरणा देणारी घटना अजनसरा गावात घडली आहे. आजनसरा येथील शेतकरी नामदेवराव हुलके यांनी गोपालकाचं गोमातेविषयी असलेले अनोखे नाते व्यक्त केले आहे. गेल्या तीस वर्षांपासून सांभाळत असलेल्या ‘पार्वती’ नामक गोमातेला अखेरचा निरोप देताना मात्र त्यांना अश्रू अनावर झाले. आपल्या घरच्या सदस्याप्रमाणे त्यांनी ‘पार्वती’ला सांभाळले होते. मात्र आज तिच्या अश्या अचानक झालेल्या मृत्यूने त्यांना दुःख झाले . तिला सन्मानाने अखेरचा निरोप द्यायचा असे त्यांनी ठरवले, त्यांनी तशी तयारी देखील केली. इतकेच नव्हे तर एखाद्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीप्रमाणे ‘पार्वती’ या गाईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अगदी वाजत गाजत गोमातेची अंत्ययात्रा काढण्यात आल. तीला नामदेवराव हुलके यांनी आपल्या शेतातच पुरविले. यावेळी पाहण्यासाठी गावाकऱ्यांची गर्दी जमली होती.


