कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर जळाल्याचा सेलू शहराला बसतोय फटका
पंधरा दिवसापासून सतत विजेचा लपंडाव
सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक झाले त्रस्त
अमोल चंदेल (सेलू प्रतिनिधी)
वर्धा : सेलू येथे महावितरणच्या सब स्टेशन मध्ये जळालेले कोट्यावधीचे ट्रान्सफार्मर, निकृष्ट दर्जाची उपकरणे आणि वीज वितरणातील नियोजनाचा अभाव यामुळे सेलू शहराला फटका बसतो आहे. सतत वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याने नागरिक हैराण झाले आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिक आता रोष व्यक्त करीत आहे.
वर्धा जिल्ह्यातील सेलू शहरात शहरिकणाची गती वाढते आहे. सोबतच येथील लोकसंख्या आणि कुटुंब संख्या देखील वाढते आहे. त्यानुसार शहराची वाढती विजेची मागणी देखील तेवढीच महत्वाची आहे. असे असताना सेलू शहरासाठी दोन वेगवेगळे फिडर असल्याची माहिती मिळते. पण यापैकी बेलगाव येथील पर्यायी फिडरवरून सेलू शहराच्या व्यतिरिक्त कोलगाव, घोराड, महाबळा व इतर गावांना देखील वीज पुरवठा केला जात असल्याची माहिती आहे. तसेच विविध गावाच्या पाणी पुरवठा योजनाचा भार देखील सेलूच्याच फिडर वर आहे. इतर गावांना वेगळे फिडर देण्याच्या सूचना यापूर्वी ऊर्जा मंत्रालयाकडून दिल्या गेल्या होत्या. पण अनेक गावांना मिळणारे गावठाण फिडर गेले कुठे असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहे. सेलू शहरात गेल्या पंधरा दिवसापासून कुठलीही पूर्व सूचना न देता विजपुरवठा खंडित केला जातो. गेल्या पंधरा दिवसात महावितरण अभियंता अनमोल गजभिये यांच्याकडे सेलू येथील नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या पण त्याचे निराकरण झाले नाही. याउलट येथे शहरालगत होणारे ले आउट आणि तेथे पोहचवली जाणारी वीज याच बाबिकडे गजभिये यांनी प्राधान्य दिले आहे. उपविभागीय अभीयंता शिरपूर यांनी देखील सतत दुर्लक्ष केले असल्याची प्रतिक्रिया सेलू शहरात उमटत आहे.

