विविध सभांमध्ये आरोप प्रत्यारोप; अखेर कौल कुणाला
वर्धा : वर्धा जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्रात प्रचारासाठी झालेल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या सभा लक्षणीय ठरल्या आहे. कुठे भाजपच्या नेत्यांच्या सभा गाजल्या तर कुठे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा आकर्षण ठरल्या आहे. शरद पवार, नितीन गडकरी यांच्या सभा गाजल्याने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झाली. आता प्रचार तोफा थंडावल्या आहे, त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत कौल कुणाला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
वर्धा जिल्ह्यात आर्वी, हिंगणघाट, वर्धा आणि देवळी या चार विधानसभा क्षेत्रात निवडणूक ज्वर हा अखेरच्या टप्प्यात दिसून आला. देवळी विधानसभा क्षेत्रात पुलगाव चित्रा वाघ यांची पदयात्रा, हिंगणघाट येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतुल वंदिले यांनी काढलेला रोड शो, गौतमी पाटील यांची रॅली आणि वर्ध्यात शेखर शेंडे व सचिन पावडे या उमेदवारांच्या रॅली आकर्षण ठरल्या आहे.
प्रचाराच्या सुरुवातीलाच शरद पवार हिंगणघाट शहरात दाखल झाले. अतुल वंदिले यांच्यासाठी मते मागत बंडखोरी शमविण्याचा प्रयत्न केला. त्यांची गोकुलधाम मैदानावर झालेली सभा गाजली. तर हिंगणघाट येथे भाजपने स्मृती इराणी यांना सभेसाठी बोलावून प्रचाराचा झंझावात केला. नितीन गडकरी यांची सभा उमेदवार समीर कुणवार यांच्यासाठी समुद्रपूर येथे पार पडली. वर्धा विधानसभा क्षेत्रात सेलू येथे काँगेसचे शेखर शेंडे यांच्या प्रचारासाठी कन्हैय्या कुमार येऊन गेले. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता नितेश कराळे यांची सभा हिंगणी येथे चांगलीच गाजली आहे. तर तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवन्न रेड्डी यांची सभा वर्ध्यात कोचर ग्राउंड येथे पार पडली.
आर्वी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची सभा झाली, आष्टी येथे देखील बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. आर्वी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मयुरा काळे यांच्यासाठी सुप्रिया सुळे यांची सभा पार पडली तर कारंजा येथे रोहित पवार यांनी सभा गाजवली आहे. त्यामुळे या सभांचा काय फायदा होतो ते पाहणे महत्त्वाचे आहे. आर्वी येथे भाजपसाठी सुमित वानखेडे हे उमेदवार असताना खासदार कंगना राणावत यांची सभा झाली, त्यानंतर नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या प्रचारातील अंतिम सभा पार पडली आहे.
देवळी येथे पुलगाव शहरात नीतीन गडकरी यांनी सभा घेतली तर चित्रा वाघ यांचा रोड शो झाला आहे. चंद्रशेखर बावनकुडे यांची आंजी येथील सभा झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कुंदन जांभुळकर यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली आहे. नेमका या सभांचा काय फायदा होतो ते पाहणे महत्वाचे आहे. काँग्रेसकडून सचिन पायलट सभेसाठी पुलगाव शहरात येऊन गेले आहे. आमदार अभिजीत वंजारी यांची सभा, सचिन सावंत यांची कॉर्नर सभा देखील येथे झाली आहे.
वर्ध्यात चारही मतदार संघात झालेल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या वेगवेगळ्या सभा चर्चेत राहिल्या आहे. या सभांमधून हुंकार फुंकण्यात आला, मते मागण्यात आली, आरोप प्रत्यारोप झाले. आता नेमका कौल कुणाला मिळतो याकडे लक्ष आहे.
Post Views: 171




