वर्धा – हिंगणघाट येथील दालमीलमध्ये काम सुरू असताना डाळीच्या हौदात कामगाराचा मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर दालमिल मालकाने पोलिसांना व त्याच्या नातेवाईकांना सूचना न देताच परस्पर त्या कामगाराच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहे. सदर घटना बुधवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली आहे. पोलिसांकडे नातेवाईकांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून कंपनीचा मालक फरार झाला आहे.
बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील अमृतनगर येथील 16 वर्षीय कामगार प्रभाशकुमार यादव हा हिंगणघाट येथे मानधनिया इंडस्ट्रीज दलमीलमध्ये कार्यरत होता. गेल्या काही महिन्यांपासून कार्यरत असणाऱ्या या कामगाराने नेहमीप्रमाणे आपले काम बुधवारी सुरू केले. रात्री 9 वाजताच्या सुमारास प्रभाश दालमील मधील डाळीच्या हौदात उतरला. याच हौदातील डाळ बाहेर निघणाऱ्या आऊटलेट मध्ये तो अडकला. तर याच हौदात वरून पडणारी डाळ त्याच्या अंगावर पडत राहिली. यात त्याचा गुदमरून मृत्यू झाला. सदर घटनेने हादरलेल्या दालमिल मालकाने मात्र त्याच्या नातेवाईकाला पूर्व सूचना दिली नाही. तर पोलिसांना देखील याबाबत माहिती दिली गेली नाही. कंत्राटदार व कामगारांच्या मदतीने मृत झालेल्या प्रमोदचा मृतदेह जाळण्यात आला आहे. हिंगणघाट येथील स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याच दालमील मध्ये कार्यरत असणाऱ्या त्याच्या भावाने मात्र सदर घटनेची माहिती कुटुंबाला दिली. नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली आणि घडलेले सर्व प्रकरण समोर आले आहे. दिल्ली येथील मृतकाचा नातेवाईक कैलास जाधव याने दिल्ली पोलिसांना सदर प्रकरणात माहिती दिली. त्यामुळे या प्रकरणात हालचाली सुरू झाल्या. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली असून प्रभाश हा 16 वर्षाचा असल्याने बाल कामगार हा विषय हाताळणाऱ्या कामगार अधिकारी कार्यालयावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हिंगणघाट पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे नोंद केले असून आतापर्यत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यामध्ये कंत्राटदार अजितकुमार यादव, कामगार अशोक कुरिया, सुपरवायझर दिलीप असलकर, यांचा समावेश आहे. तर या कंपनीचा मालक आणि कंपनी मॅनेजर मात्र फरार झाला आहे.
कामगाराचा गुदमरून मृत्यू झाल्याने या अपघाताची माहिती हिंगणघाट पोलिसांना देणे आवश्यक होते. तसे न करता दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता परस्पर स्मशानभूमीमध्ये मृतदेह जाळण्यात आला आहे. कंपनीतील काही कामगारांनी रुग्णालयात मृतदेह नेण्याबाबत तत्परता दाखविली होती पण त्यांना देखील कंपनी चालक व मालकाने गप्प करीत परस्पर मृतदेह जाळण्याची खटाटोप केला आहे. त्यामुळे मृतदेहाचे शवविच्छेदन देखील होऊ शकले नाही. हिंगणघाट पोलिसांनी गुन्हे दाखल करीत आरोपींचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती पोलीस उप निरीक्षक पी एस पाटणकर यांनी दिली आहे.


