वर्धा : शेतकऱ्यांच्या कपाशीच्या दरात सतत घसरण होत असताना शेतकऱ्यांनी मोर्चा काढत आक्रोश केला आहे. कारंजा येथे शेतकऱ्यांनी एकत्र होत जयकुमार बेलखडे यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढला. बैलगाडीवर स्वार होत शेतकरी मोर्चात सहभागी झाले. ग्रामीण भागातून कापूस दरवाढीसाठी एकवटलेल्या शेतकऱ्यांमध्ये महिला शेतकऱ्यांचा देखील समावेश होता.

यावर्षी कपाशीचे भाव आठ हजार रुपयांच्या आसपास होते. ते देखील गेल्या काही दिवसात सातशे ते आठशे रुपयांनी कमी झाले आहे. शेतकऱ्याने पिकविलेल्या कापसाला भाव मिळाला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी कारंजा तालुक्यात आवाज उचलला आहे.

शेतमालाचे भाव सतत कमी होत आहे. सोयाबीनला भाव नाही, कपाशीला   भाव नाही, चण्याची अवस्था देखील तशीच आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. कापूस पोकविला पण तो विकता येत नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली असताना कारंजा तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांनी एकत्र येत जयकुमार बेलखेडे या शेतकरी  व सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात अक्रोश मोर्चा काढला. कारंजा येथील जयस्तंभ चौकात शेतकऱ्यांनी बैलगाड्या जुंपल्या. बैलगाडीसोबत निघालेला मोर्चा कारंजा शहरातील मुख्य मार्गाने पोलीस स्टेशन पर्यत पोहचला. येथे घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. पुढे हा मोर्चा उड्डाण पुलाखाली पोहचला त्याठिकाणी देखील मोठ्या संख्येत शेतकऱ्यांनी एकत्र होत नारेबाजी करण्यात आली. कापूस दर कमी होण्यामागे सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सरकारच्या विरोधात घोषणा देऊन लक्ष वेधण्यात आले आहे. बैलगाडीला तिरंगा बांधून मोर्चा पुढे सरकत असताना बैलगाड्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. महिला शेतकरी देखील मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

शेतकऱ्यांनी बैलगाडीवर चढत काढलेला हा मोर्चा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. हजारोच्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. बैलगाडीवर बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या हातात तिरंगा असल्याने या तिरंग्याकडेचे शेतकरी दाद मागत असल्याचे चित्र मोर्चात होते.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी आपले पीक गमावले असताना आता शेतकऱ्यांची भिस्त कपाशिवर होती. कपाशीला भाव मिळेल अशी अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला. अखेर अद्याप भाव वाढलेच नाही तर उलट हे भाव गडगडले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 8 हजार रुपयांवर असलेले भाव आता 7 हजारांच्या घरात आले आहे. आता कापूस घरात तरी किती दिवस ठेवायचा असाच प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी आक्रोश करण्याचा पोवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांनी आक्रोश करून भाव मागितले आहे.

“शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या ही आमची रास्त मागणी आहे. कपाशीला मागील वर्षी 12 ते 14 हजार रुपयांच्या घरात भाव मिळाले. त्यामुळे यावर्षी 15 हजार रुपयांचे भाव मिळतील अशी अपेक्षा आहे. त्यासाठीच मोर्चा काढण्यात आला आहे. अंगावरील कपड्याचे भाव कधी कमी होत नाही ते सतत वाढतात. तर मग कापसाचे भाव देखील वाढायला पाहिजे ” – जयकुमार बेलखडे

बैलगाडीमध्ये कापूस देखील ठेवण्यात आला. पिकविलेला कापूस भाव मिळत नसल्याने न्यायचा कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाला विचारला आहे. हा कापूस आमच्या घामाचा आहे. हे आमचे पांढरे सोने आहे. ज्यातून शरीर झाकले जाते, झोपायला अंथरून आणि पांघरून म्हणून देखील सुरक्षा करतो आहे. असे शेतकरी यावेळी सांगत होते.

breakingvidarbha

Share.
Leave A Reply