जिल्ह्यातील 1 लाख 4 हजार विद्यार्थ्यांनी लिहिले नातेवाईकांना पत्र
मतदार जागृती साठी शाळकरी विद्यार्थ्यांचा पुढाकार
वर्धा : लोकशाहीच्या उत्सवात मतदान करा! आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराच्या बाहेर पडण्यासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पत्रातून आई वडील ,दादा ताई यांना भावनिक साद घातली आहे. लाखो विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांना व नातेवाईकांना तसे पत्रच लिहिले आहे.

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळेच्या 1 लाख 4 हजार 634 विद्यार्थ्यांनी नातेवाईकांना स्वत:च्या हस्त अक्षरात पत्र लिहिले असून त्यावरती पालकांची स्वाक्षरी घेवून त्याबाबतची नोंद शाळा दप्तरी ठेवण्यात आली आहे.

पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या 1 हजार 469 शाळेच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला असून सेलू तालुक्यातील 154 शाळा, आर्वी तालुक्यातील 209 शाळा, हिंगणघाट तालुक्यातील 222 शाळा, कारंजा (घा.) तालुक्यातील 124 शाळा, समुद्रपूर तालुक्यातील 197 शाळा, आष्टी तालुक्यातील 91 शाळा, वर्धा तालुक्यातील 295 शाळा व देवळी तालुक्यातील 177 शाळांचा यामध्ये समावेश होता.



