देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण
– जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
वर्धा : महाराष्ट्र ही समाजसुधारकांची व शूरवीरांची भूमी आहे. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी आपल्या आयुष्याचं समर्पण करुन अनेक समाजसुधारणा घडवून आणल्या. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच राज्याची वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी केली असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्हा क्रिडा संकुल, वर्धा येथील मैदानावर 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधीत करतांना कर्डीले बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी वृष्टी जैन, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
सुरूवातीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. स्वतंत्र मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी अनेक मराठी बांधवांना सातत्याने संघर्ष करावा लागला. या संघर्षात 105 बांधवांना शहीद व्हावे लागले. या सर्व शहीदांना जिल्हाधिकाऱ्यांनी नमन केले.



