वर्धा – विशेष व्यक्तींमध्येही उत्तुंग प्रतिभा असल्याची अनेक उदाहरणे आपल्या अवतीभवती आहे. त्यामुळेच अशा बालकांची प्रतिभा ओळखून पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांना योग्य प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सावंगी येथे आयोजित इंद्रधनुष्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले. दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ आणि जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दत्ता मेघे सभागृहात आयोजित या उद्घाटन समारोहाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. नूरुल हसन, श्रीमती प्रियांका कर्डिले, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे, अभिमत विद्यापीठाचे प्रकुलगुरू डाॅ. गौरव मिश्रा तसेच आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डाॅ. अभ्युदय मेघे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डाॅ. चंद्रशेखर महाकाळकर, शरद पवार दंत महाविद्यालयाच्या संचालक मनीषा मेघे, अस्थिरोग विभाग प्रमुख डाॅ. अंबादे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर यांची उपस्थिती होती.
यावेळी, जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या शासनाच्या सर्व योजना प्रशासन आणि संस्थांच्या समन्वयातून कार्यरत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही दिली. तर, नूरुल हसन यांनी यावेळी दिव्यांगांच्या संपूर्ण सुरक्षिततेसाठी पोलीस विभाग २४ तास दक्ष असेल, याची शाश्वती दिली.
कार्यक्रमाची सुरूवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यनाट्याने झाली. प्रारंभी डाॅ. अभ्युदय मेघे यांनी प्रास्ताविकातून दिव्यांगांसाठी सावंगी रुग्णालयात असलेल्या विविध योजना, आरोग्यसेवा आणि विशेष सेवांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन डाॅ. माधुरी वाणे यांनी केले तर आभार स्पीच थेरपीस्ट किरण कांबळे यांनी मानले.

या महोत्सवात मूकबधिर विद्यालय, अंध विद्यालय व अस्थिव्यंग विद्यालय वर्धमनेरी, शारदा विद्यालय व राष्ट्रसंत तुकडोजी अंध विद्यालय नालवाडी, संत केजाजी महाराज विद्यालय घोराड, राजीव गांधी विद्यालय, चिंतामणी निवासी मतिमंद विद्यालय पुलगाव, गजानन मतिमंद विद्यालय, श्री गजानन महाराज प्रौढ मतिमंद मुलामुलींची निवासी कार्यशाळा, कार्मेल मतिमंद विद्यालय सावंगी, स्व. रावसाहेब निवासी मतिमंद विद्यालय देवळी, जय बजरंग निवासी मतिमंद विद्यालय वायगाव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मतिमंद मुलामुलींची निवासी विशेष शाळा हिंगणघाट आणि आरंभ बहुद्देशीय संस्था येथील विशेष विद्यार्थी सांस्कृतिक उपक्रम आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या आयोजनात सहाय्यक सल्लागार सोनाली शिंदे, कार्यकारी अधीक्षक प्रतिभा भागवतकर, सावंगी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे, अधिपरिचारिका माधुरी ढोरे, सुशांत वानखेडे, समाजिक कार्यकर्ता राकेश अगडे, अभिजीत वानखेडे, नलू शंभरकर आदींचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.


