वर्धा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी, भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील तसेच भाजप प्रवक्ता सुधानशू त्रिवेदी यांनी केलेल्या महापुरुषांच्या विरोधी विधानाचा सोमवारी आर्वी येथे निषेध नोंदविण्यात आला. भाजप सोडून सर्व राजकीय पक्षांकडून एकत्र येत येथे आर्वी बंद ची हाक देण्यात आली. मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. आर्वीकरांनी या बंदला मोठा प्रतिसाद दिला आहे.
भाजप नेत्यांकडून सतत होत असलेल्या अपमाणकारक वक्तव्याने महाराष्ट्रात चुकीचा संदेश जात आहे. भाजप कडून होत असलेल्या या प्रकाराला आळा बसण्यासाठी आर्वी येथे सर्व राजकिय पक्ष एकत्र आले. माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वाखाली आर्वी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरातील सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. बस स्थानक परिसर, शिवाजी चौक परिसर, मुख्य बाजारपेठ व शहराच्या गल्लीबोळात दुकाने बंद होती. कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. मोर्चात विविध भाजप विरोधी घोषणा देत निषेध नोंदवला गेला. काँग्रेस,शिवसेना, प्रहार, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई व विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी छत्रपती शीवाजी महाराज यांच्याबद्धल एकेरी शब्दात विधाने करणाऱ्या सुधानशू त्रिवेदी यांचा माजी आमदार अमर काळे यांनी माध्यमाला प्रतिक्रिया देताना समाचार घेतला. शहरात मोर्चा काढून सर्व राजकीय पक्षांकडून महापुरुषाच्या विरुद्ध प्रवृत्ती कडे लक्ष वेधण्यात आले आहे.


