वर्धा : वर्ध्यातील एस टी आगारातून निघालेल्या शिवशाही बसचा नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी नजीक आसोला येथे अपघात झाला होता. या अपघातात बसला वाचविण्याच्या प्रयत्नात वर्ध्याच्या अरूण नेहारे नामक चालकाचा मृत्यू झाला. वर्ध्याच्या आगारातील बसेस नादुरुस्त असल्याने बसगाड्याचे अपघात होत असल्याचा आरोप वाहक व चालक संघटनांनी केला आहे. रविवारी चालक व वाहकांनी एकत्र येत विभागीय नियंत्रकांना याबाबत जाब विचारला आहे. वर्ध्याच्या राम नगर येथील बस डेपोमध्ये चालक व वाहक एकत्र झाले, गाडी दुरुस्तीसाठी टाकली असताना देखील तीच गाडी चालकाला दिली जातेय असा आरोप यावेळी चालकांनी केला आहे.
चालक अरुण नेहारे आणि वाहक प्रशांत भुषणवार यांनी शनिवारी शिवशाही ही गाडी वर्धा येथून नागपूरला नेली. या बसमध्ये एकूण 26 प्रवासी चढले होते. रस्त्यात बुटीबोरी नजीक असोला येथे गाडीचे ब्रेक लागले नाही.त्यामुळे ट्रकला धडक लागणार असल्याने चालकाने ही गाडी दुभाजकावर चढवली, यात अरुण नेहारे या वाहन चालकाचा मृत्यू झाला. सदर गाडी यापूर्वी देखील बऱ्याचदा ब्रेक फेल झाल्याची माहिती आहे. एस टी महामंडळाच्या गाड्या सतत फेल होत असल्याची सबब पुढे करून वर्ध्याच्या राम नगर येथील एस टी डेपोमध्ये सर्व कर्मचारी, वाहक व चालक एकत्र झाले. संघटनांनी ब्रेक फेल होणाऱ्या गाड्यांकडे प्रशासन विशेष लक्ष देत नसल्याचा आरोप केला आहे. आगारात दुरुस्ती साठी आलेली गाडी देखील योग्य पद्धतीने व सुरक्षित दुरुस्ती होत नाही. शिवशाही या बसचे देखील असेच झाले होते अशी व्यथा कर्मचारी प्रमोद गुंडतवार यांनी मांडली. याच गाडीवर वाहक असणाऱ्या प्रकाश भुषणवार यांना गाडी फेल झाल्याचा अनुभव आला. सदर चालकाने आपला जीव गमावून प्रवस्यांचे जीव वाचविले असल्याचे प्रकाश भूषणवार यांनी सांगितले आहे. वाहतूक नियंत्रकांची भेट घेत समस्या मांडण्यात आल्या. बस मध्ये भरण्यात येणार डिझेल देखील डेपोमध्ये असणाऱ्या पेट्रोल पम्पवरच भरण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
अपघातात मृत पावलेल्या चालकाच्या मृत्यूला एस टी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप चालकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.


