वर्धा : सत्तेचा सतत गैरवापर होत आहे, रोज हे दैनंदिन जीवनात पाहायला मिळत आहे. लोक अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, सरकारमधील कुणी याकडे ढुंकूनही बघायला तयार नाही. पंतप्रधान म्हणतात माझ्याशी कुणी संघर्ष करू शकत नाही, माझ्याशी कुणी लढू शकत नाही. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. वर्ध्याच्या सर्कस मैदानावर अयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी मंत्री प्राजक्त तानपुरे, युवक आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष सक्षना सलगर, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, आशा मिरगे, सुरेश देशमुख उपस्थित होते.

निर्धार मेळाव्यात वर्ध्यातील राजकीय परिस्थिती बदलण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. ज्यांच्या हातात सत्ता दिली त्याचा उपयोग लोकांचे दुःख दूर करण्यासाठी व्हायला पाहिजे होता, पण तसे आता होत नाही. वर्धा जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला त्रासून आत्महत्या केली. आपण कृषी मंत्री असताना मनमोहन सिंग यांच्याकडे गेलो,त्यांना सांगितलं शेतकऱ्यांच दुःख समजून घेतलं नाही तर आपल्याला सत्तेत बसण्याचा अधिकार नाही.तेव्हा मनमोहन सिंग वर्ध्यात आले, यवतमाळ येथे आले. दुःख समजून घेतले आणि सर्वात मोठी कर्जमाफी केली. आज आत्महत्या होत आहे तरीही कोणी ढुंकून बघायला तयार नाही, याचे दुःख आहे, असे त्यांनी सांगितले.

अनिल देशमुख आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर 130 धाडी टाकल्या. सत्तेचा गैरवापर करून कारवाई करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कापशीला भाव नाही, सोयाबीनची अवस्था वाईट आहे याकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बोलताना म्हटले की, आपल्यावर खोटे आरोप करून 14 महिने आपला छळ करण्यात आला. परिवारातील लोकांना त्रास देण्यात आला.ज्या ठिकाणी कसाब ला ठेवण्यात आले त्या ठिकाणी आपल्याला ठेवले. सारेकाही खोटेनाटे केले जात आहे, सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. आता पुढील काळात निर्धार करावा लागेल, प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवावी लागेल. महाविकास आघाडीला विधान परिषदेत यश मिळाले. ईडी आणि सीबीआय च्या भीतीने खऱ्या शिवसेनेतील आमदार सोडून गेले असे अनिल देशमुख म्हणाले.

माजी केंद्रीय मंत्री तथा संपर्क प्रमुख सुबोध मोहिते यांनी वर्धा जिल्ह्यात एक खासदार आणि दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे राहतील असा निर्धार केला.त्यासाठी आत्ता पासून सर्व कामाल लागतील असे सांगितले.

तर नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये केलेले प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील जुन्या पदाधिकाऱ्यांनी नवीन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.आम्ही गड जिंकून दाखवू असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. निर्धार मेळाव्याला जिल्ह्यातून हजारोच्या संख्यने कार्यकर्ते वर्ध्यात दाखल झाले होते.


