वर्धा- वर्ध्याच्या सिंदी रेल्वे नजीक गौळ भोसा शेतात विहिरीचे काम सुरू असताना दोन मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची घटना घडली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविन्यात येत आहे. दबलेल्या मजुरांमध्ये 40 वर्षीय अमोल दशरथ टेंभरे व 28 वर्षाच्या पंकज प्रभाकर खडतकर याचा समावेश आहे. अद्याप दबलेल्या मजुरांना काढणे शक्य झाले नाही, त्यामुळे महसूल विभागाने एन डी आर एफ च्या चमुला पाचारण केले आहे. सिंदी रेल्वे येथील
शेतकरी सर्जेराव वरभे यांच्या शेतामध्ये विहिरीचे काम सुरू होते. यावेळी पाच मजूर कामावर कार्यरत होते. विहिरीत उतरलेल्या अमोल टेंभरे व पंकज खडतकर हे दोन मजुर विहिरीचा भाग खचल्याने खाली कोसळले. यात त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा पडला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्याने मजुरांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज बांधला जात आहे. सायंकाळ पर्यत रेस्क्यू करण्याचे काम सुरू होते. पण सायंकाळी शेतात अंधार झाल्याने काम थांबले आहे. एस डी आर एफ चमू बोलावून मजूर काढण्यात येईल असे सांगण्यात आलेय.


