वर्धा : समृद्धीच्या महामार्गावर मूक प्राण्यांचा जीव जाणे ही आता नेहमीची बाब झाली आहे. माणसांसाठी वेळेची बचत करणारा समृद्धी महामार्ग मात्र मुक्या प्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. अश्याच एका घटनेत वर्ध्यालगत पहाटे येळाकेळी जवळ महामार्ग ओलांडत असताना वानराच्या कडपातील मादी वानराला वेगात येणाऱ्या गाडीची जोरदार धडक लागली.

आपला मृत्यू डोळ्यासमोर दिसणाऱ्या या आईने मात्र आपल्या पिल्लाला क्षणात आपल्यापासून दूर फेकले. स्वतः मृत्यूशी झुंज देणाऱ्या मादी वानराच्या या आकांताला पाहून याच मार्गावर ओडिशावरून नाशिकला जाणाऱ्या ऍबुलन्सच्या कर्मचाऱ्यांना हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे ठरले.

ऍम्बुलन्स मधील कर्मचारी किशोर सूर्यवंशी आणि विक्की पठाण यांनी लगेच नजीकच असलेल्या येळाकेळी येथील टोल नाक्याशी संपर्क साधला. लगेच मादी आणि पिल्लाला पिपरी येथील करूनाश्रमात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मादी वानराचा मृत्यू झाला मात्र पिल्लू बचावले. पिल्लाचा सांभाळ करुणाश्रमात सुरू आहे. मूक प्राण्याला जीवदान देवून अंबुलन्स च्या कर्मचाऱ्यांनी देवदूताचेच काम केले आहे.


