वर्धा: शेतकरी उत्पन्न वाढविण्याकरिता सिंचनाची सोय करीत असतो. त्यासाठी बरेच शेतकरी गावतलावातून पाण्याची उचल करतात. परंतु तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने तलावाची साठवणूक क्षमता कमी होऊन सिंचनाचा प्रश्न निर्माण होतो. हीच बाब लक्षात घेवून जमनालाल बजाज सेवा ट्रस्टने लोकसहभागातून तलाव गाळमुक्त करण्याचे कार्य हाती घेतले आहे. यातूनच कारंजा (घाडगे) तालुक्यातील सिर्शी-मोर्शी येथील तलाव गाळमुक्त करण्याचे काम सुरु केले असून त्याचा चार गावांना फायदा होणार आहे.

कारंजा (घाडगे) तालुक्यातील सार्शी-मोर्शी ग्रामपंचायत अंतर्गत एक तलाव आहे. या तलावाच्या पाण्याचा सार्शी-मोर्शीसह हेटीकुंडी, ठाणेगाव व खरसखांडा या गावांना आणि येथील शेतकऱ्यांना फायदा होतो. या तलावातून आताही शेतकरी सिंचनाकरिता पाण्याची उचल करतात. या तलावात गाळ साचल्याने पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाली आहे. परिणामी उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना सिंचनाकरिता तसेच गुरांकरिता पुरसे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे सार्शी-मोर्शी येथील नागरिकांच्या मागणीनुसार दहा टक्के लोकसहभागातून जमनालाल बजाज सेवा ट्रस्टने या तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या कार्याच्या शुभारंभाप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, जमनालाल बजाज सेवा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भार्गव, विजय गाखरे, मोर्शीचे सरपंच नामदेवराव देवासे, खरसखांड्याचे माजी सरपंच विकास नासरे, जीवन चरडे, दादाराव दुपारे, अशोक गोहते, दिनेश ढोबळे, देवेंद्रा नारसे, जमनालाल बजाज सेवा ट्रस्टचे राजेंद्र खर्च, प्रफुल्ल बनसोड व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

पाणीही साठणार, जमिनीचा पोतही सुधरणार –
या तलावातून गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली असून या तलावातून ६० हजार घनमिटर गाळ काढला जाणार आहे. त्यामुळे या तलावात जवळपास साडेपाच लाख घनमिटर पाणी साठणार आहे. या पाण्यामुळे उन्हाळ्यातही सिंचनाची सोय होणार आहे. तसेच हा गाळ सार्शी-मोर्शीसह हेटीकुंडी, ठाणेगाव, खरसखांडा, बोरी व धर्ती-मुर्ती या गावातील शेतकरी आपल्या शेतात टाकत असल्याने जमिनीचा पोत सुधरणार आहे. या सवार्मुळे उत्पादन क्षमतेतही भर पडणार आहे.
संजय भार्गव, मुख्य कार्यकारी अधिकारी, जमनालाल बजाज सेवा ट्रस्ट, वर्धा म्हणतात,
“आपल्याकडील शेतकरी मेहनती आहे, त्याला थोड्याफार सहकायार्ची गरज आहे. शेतकऱ्यांना योग्य सुविधा मिळत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. तलाव दिले परंतु त्याचा गाळ उपसला नसल्याने शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे जमनालाल बजाज सेवा ट्रस्टच्यावतीने लोकसहभागातून तलाव गाळमुक्त करण्याचे काम सुरु केले आहे. यापूर्वी दोन तलाव गाळमुक्त केले आता सार्शी-मोशीर्तील तलावाचे काम हाती घेण्यात आले आहे. सुरुवातीला एक जेसीबी मशीन लावण्यात आली होती. आता शेतकऱ्यांचा सहभाग लक्षात घेता दोन मशीनने काम सुरु आहे.”
नामदेवराव देवासे, सरपंच मोर्शी म्हणतात,
“बऱ्याच वर्षांपासून या तलावात गाळ साचला होता. त्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता कमी होऊन उन्हाळ्यात सिंचनाकरिता आणि जनावरांकरिता पाणी उपलब्ध राहत नव्हते. त्यामुळे आम्ही जमनालाल बजाज सेवा ट्रस्टला विनंती केली आणि त्यांनी मदतीचा हात दिल्याने तलाव गाळमुक्त करण्याच्या कामाला सुरुवात झाली. यामुळे परिसरातील चार गावांना मोठा फायदा होणार आहे.”


