अखेर वैद्यकीय महाविद्यालयचा मार्ग मोकळा
हिंगणघाट -आर्वीतही मिळणार सुविधा
वर्धा : राज्य शासनाने वैद्यकीय महाविद्यालय जाहीर केल्या नंतर सर्वात प्रथम आर्वीचा विचार करण्यात आला होता. मात्र, हिंगणघाट येथील दबाब वाढत गेला. दरम्यान, सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वात काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध संघटनानी निवेदन देऊन आर्वीची गरज लक्षत आणून दिली होती. अखेर, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुवर्णंमध्य साधून हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करायला हिरवी झेंडी दाखवली तर तळेगाव श्यामजीपंत येथेही जागतिक बँकेच्या सोबत महाराष्ट्र शासनाच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार PPP तत्वावर वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यात येईल, असे आज विधानसभेत जाहीर केले.
विधानसभेत निवेदन करताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की वर्धा जिल्ह्यामध्ये नवीन होणा-या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वर्धा शहर, हिंगणघाट व तळेगाव या तीन ठिकाणच्या विविध जागांसंदर्भात सर्वसमावेशक चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय आर्युविज्ञान आयोगाच्या मानकांनुसार १०० एम.बी.बी.एस. विद्यार्थी प्रवेश क्षमतेसाठी किमान ४२० खाटांचे दोन वर्षापासून कार्यरत असलेले रुग्णालय संलग्नित असणे आवश्यक आहे. तथापि, वर्धा येथे २८६ खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय असून राष्ट्रीय आयु॑विज्ञान आयोगाची मानके पूर्ण होत नाहीत. तसेच वर्धा येथे एक अभिमत वैद्यकीय महाविद्यालय व एक शासन अनुदानित वैद्यकीय महाविद्यालय अस्तित्वात असल्याने त्याच ठिकाणी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे उचित होणार नाही.
या व्यतिरिक्त हिंगणघाट अथवा तळेगाव येथे महाविद्यालय सुरु करावयाचे झाल्यास तेथे त्या क्षमतेचे रुग्णालय नसल्याने प्रथम नवीन ४३० खाटांचे रुग्णालयाचे बांधकाम करावे लागेल व त्यानंतर दोन वर्षांनी नवीन महाविद्यालय सुरु करण्यासाठी राष्ट्रीय आर्युविज्ञान आयोगाकडे अर्ज करता येईल.
सर्वसमावेशक चर्चेअंती हिंगणघाट हे ठिकाण योग्य असून त्या ठिकाणी नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी, वर्धा यांनी जागा उपलब्ध करुन द्यावी असा निर्णय घेण्यात आला. तसेच वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी व आजुबाजूच्या तालुक्यामधील अपुऱ्या आरोग्य सुविधा पाहता तळेगाव येथे नव्याने मान्यता देण्यात आलेल्या ३०० खाटांच्या सामान्य रुग्णालयाच्या उभारणीस गती देण्यात येईल व येथेही राष्ट्रीय आर्युविज्ञान आयोगाच्या मानकांची पूर्तता झाल्यानंतर जागतिक बँकेच्या अधिनस्त international finance corporation सोबत महाराष्ट्र शासनाच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार PPP तत्वावर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास शासनातर्फे प्राधान्य देण्यात येईल, असे जाहीर केले.
तळेगाव येथे ३०० खाटांचे रुग्णालय व तद्नंतर काही अवधीतच तांत्रिक बाबी पुर्ण झाल्यावर वैद्यकीय महाविद्याल
होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव सुमित वानखेडे यांनी पोट तिडकीने वैद्यकीय महाविद्यालयसाठी पाठपुरावा करून या भागातील आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रयत्न केल्याने आर्वी विधानसभा मतदार संघतील नागरिकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुमित वानखेडे यांचे आभार मानले.
आपले सहकार्य महत्वाचे : वानखेडे
आपल्या मतदार संघ सर्व सोयी सुविधानी पूर्ण असावा यासाठी माझी तळमळ आहे. आपण वेळोवेळी जे सहकार्य करता त्यातून मला अजून ऊर्जा मिळते. आवण असेच सहकार्य करीत रहावे. तांत्रिक बाबींची पुर्ताता करून वैद्यकीय महाविद्यालयचे काम सुरू होईल असा विश्वास सुमित वानखेडे यांनी व्यक्त केला.


