आरोग्य संकल्प अभियानातून साडेतीन हजार रुग्णांची आरोग्य तपासणी
वर्धा – रुग्णालये ही रुग्णांच्या आरोग्यसेवेसाठी असतात, ती नफा कमविण्यासाठी नाहीत. त्यामुळे उत्पन्नाचे साधन म्हणून आम्ही आमच्या रुग्णालयांकडे बघत नाही, असे उद्गार दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे यांनी काढले. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाद्वारे सेलू येथे आयोजित मोफत आरोग्य सेवा महाशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दीपचंद चौधरी विद्यालयाच्या विस्तीर्ण परिसरात आयोजित या शिबिराचा सेलू परिसरातील साडेतीन हजाराहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला.

मेघे उच्च शिक्षण संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांच्याकडून वर्धा सोशल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य संकल्प अभियानांतर्गत या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन कुलपती दत्ता मेघे यांच्या हस्ते करण्यात आले. या समारोहाला खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, लोकसभा निवडणूक प्रमुख सुमित वानखेडे, आरोग्य अधिकारी डॉ. राज पराडकर, डॉ. अभ्युदय मेघे, मनीषा मेघे, अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, प्रकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, अधिष्ठाता डॉ. अभय गायधने, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, यांची उपस्थिती होती.

सावंगी तसेच वानाडोंगरी येथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, भौतिकोपचार तसेच कँसर हॉस्पिटलमधून आर्थिक लाभ मिळत नसला तरी त्यातून मिळणारे रुग्णसेवेचे समाधान फार मोठे आहे, असे सांगून दत्ता मेघे म्हणाले, महागड्या शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी शासनाच्या योजनांतर्गत निधीची तरतूद केलेली असते, त्यातून अनेक प्रकारच्या आजारांवर पूर्णपणे मोफत उपचार करणे शक्य होते. मात्र जिथे कोणतीही तरतूद नसते अश्यावेळी स्वतःच्या आरोग्यासाठी, औषधोपचारांसाठी रुग्णपरिवाराने सहकार्य करणे अपेक्षित असते. कोरोना काळात सावंगी मेघे रुग्णालयाने दिलेल्या आरोग्य सेवेमुळे मध्यभारतातल्या हजारो नागरिकांचे प्राण वाचले आहेत, असा उल्लेख खा. रामदास तडस यांनी आपल्या भाषणात केला. तर, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेबाबत सुनील गफाट व अविनाश देव यांनी माहिती दिली. प्रास्ताविकात डॉ. अभ्युदय मेघे यांनी शिबिरातून सावंगी मेघे रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची जाण्यायेण्याचा तसेच निवास व भोजनाची व्यवस्था वर्धा सोशल फोरमद्वारे करण्यात येणार असल्याचे सांगितले. रुग्णांची सेवा हीच आपल्यासाठी ईश्वरसेवा असून गरजू परिवाराच्या मदतीसाठी आपण नेहमीच तत्पर असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमात अतिथींच्या हस्ते सावंगी रुग्णालयाच्या माहितीपूर्ण सप्तरंगी दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, ग्रामीण भागात आरोग्यसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या आशा सेविकांच्या प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सचिन घोडे यांनी केले तर डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी मानले.

या शिबिराचा लाभ घेण्यासाठी सेलू तालुक्यातील विविध गावातील गरजू नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, हृदयरोग, मेडिसिन, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, नेत्ररोग, कान, नाक व घसारोग, श्वसनरोग, मूत्रविकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, मानसोपचार, त्वचारोग, दंतरोग व मौखिक आजार या विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे रुग्णतपासणी, निदान व औषधोपचार निःशुल्क करण्यात आले. तर, सुमारे एक हजार रुग्णांना अतिरिक्त उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी सावंगी रुग्णालयात भरती होण्याकरिता डॉक्टरांद्वारे रेफर करण्यात आले. याशिवाय सोनोग्राफी, एमआरआय, एक्सरे, रक्त व लघवी तपासणीसह सर्वसामान्य चाचण्या मोफत करण्यात येतील. यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या शस्त्रक्रिया व उपचारांचा लाभही रुग्णांना प्राप्त करून दिला जाईल.


