आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे आवश्यक
वर्धा : महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियय 2017 च्या कलम 36 क नुसार दुकाने, आस्थापनांना आपले नामफलक मराठी भाषेत लिहीणे आवश्यक आहे. मराठी भाषेत नामफलक न लावल्यास कायदेशीर कारवाईस आस्थापना मालकांना समोरे जावे लागणार आहे.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 च्या कलम 36 क मधील तरतुदी नुसार प्रत्येक आस्थापनेचा नामफलक, देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे आवश्यक आहे. देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरीक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक असू शकतील पंरतू मराठी भाषेतील अक्षर लेखन नामफलकावर सुरूवातीला लिहिणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील अक्षरांचा टंक, आकार इतर कोणत्याही भाषेतील अक्षराचा टंक, आकारापेक्षा लहान असणार नाही.
ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापनांना नामफलकावर महान व्यक्तीचे किंवा गडकिल्याची नावे लिहिण्यास मनाई आहे. सरकारी कामगार अधिकारी कौ.ज.भगत यांच्या मार्गदर्शनास नामफलकाबाबत जिल्ह्यामध्ये धडक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नामफलक मराठीत लिहण्याचा निर्णय मार्च 2022 मध्ये विधिमंडळ अधिवेशनात घेण्यात आला. त्या आधी 2018 च्या निर्णयानुसार 10 किंवा 10 पेक्षा जास्त कामगार असलेल्या दुकानांवर मराठी पाटी बंधनकारक होती.
नव्या नियमानुसार कर्मचारी संख्या कितीही असली तरी पाटी मराठीत असणे बंधनकारक आहे. मराठी पाटी लावण्यास नकार दिल्यास संबंधित आस्थापना मालकाविरूद्ध न्यायालयात खटला दाखल केल्या जाईल तसेच दंड भरावा लागेल याची आस्थापनांनी नोंद घ्यावी, असे सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी कळविले आहे.


