निष्ठा यात्रेतून शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांच्या समस्याना फोडणार वाचा
वर्धा – वर्ध्यात निष्ठावंत शिव सैनिकांकडून निष्ठा यात्रा काढण्यात आली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी शनिवारी वर्ध्यातून शिवसैनिकांनी ही निष्ठा यात्रा काढली आहे. युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे यांनी या यात्रेचे नेतृत्व केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या यात्रेला सुरवात करण्यात आली. सायकलने ही यात्रा समोर जात मुंबई येथे मातोश्री वर पोहचणार आहे, सायकलवर लक्ष वेधून घेणाऱ्या राज्यातील समस्यांचा मचकूर टाकण्यात आला असून ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशी टीका देखील करण्यात आली आहे.

शेकडो शिवसैनिक या यात्रेत सहभागी झाले असून नऊ दिवसात 864 किलोमीटर अंतर पार करीत ही यात्रा मुंबई येथे मातोश्रीवर पोहचणार आहे. 11 विधानसभा क्षेत्रामधून ही यात्रा पुढे जाणार आहे. अमरावती वाशीम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यामधून ही यात्रा मुंबई येथे पोहचणार आहे. सायकलवर जाणाऱ्या शिवसैनिक आणि युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या कार्यकर्त्यांचे ठिकठिकाणी स्वागत होत असून प्रत्येक जिल्ह्यात या यात्रेत शिवसैनिक सहभागी होणार आहे.

यात्रेमधून राज्यातील बेरोजगारी, महागाई, घरकुल, आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर जनजागरण करण्यात येत आहे. युवा परिवर्तन की आवाज संघटनेने या यात्रेचे आयोजन केले असून शिवसेनेत अलीकडे फूट पडल्यानंतर शिवसैनिकांच्या निष्ठेला ठेस पोहचली, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याप्रती ठाम निष्ठा असल्याची भूमिका निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या यात्रेतून मांडली आहे.


