विषारी औषधाने झालाय मोरांचा मृत्यू
वन विभाग आरोपीच्या शोधात
वर्धा : मदनी शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतात अकरा मोर मृतावस्थेत आढळले आहे. विषारी औषधामुळे हा मृत्यू झाल्याची बाब वन विभागाच्या तपासात समोर आली आहे. दहा छोटे तर एक मोठा मोर असे एकूण अकरा मोर मृतावस्थेत आढळून आले.
मदनी येथील गजानन कुबडे यांचे मदनी शिवारात शेत आहे. याच परिसरात झुडपी जंगल आहे. येथे वन्य प्राण्यांचा देखील हैदोस नेहमीच असतो. मंगळवारी सकाळी शेतकरी गजानन कुबडे यांच्या शेतात मोर मृत अवस्थेत आढळून आले. एक मोठा तर दहा छोटे पक्षी असल्याने याची माहिती वन विभागाला देण्यात आली. मोठ्या संख्येत मोर मृत आढळल्याने संशय बळावला. नेमका मोरांचा मृत्यू कशाने झाला याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृत मोरांचे शवविच्छेदन करण्यात आले. वन विभागाने पंचनामा केला आणि मोर पंखांची देखील तपासणी केली. शवविच्छेदनावरून विषारी औषधामुळे मोरांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
शवविच्छेदनानंतर विष प्राशन केल्याने मोरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. नेमका मोरांवर विषप्रयोग कुणी केला याचा शोध वन विभाग घेत आहे. आरोपीच्या शोधात वन विभाग लागला आहे. या प्रकरणी वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे.
Post Views: 212


