ट्रायकोकार्ड व पिवळे चिकट सापळे
वर्धा : सेंद्रिय शेतीमध्ये ट्रायकोकार्ड व पिवळे चिकट सापळे पिकांवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी ट्रायकोकार्ड व पिवळे चिकट सापळे बनविण्याच्या प्रशिक्षणातून तांत्रिक माहिती घेऊन ट्रायकोकार्ड व पिवळे चिकट सापळे शेतकऱ्यांनी उत्पादित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे जिल्हा नियोजन समिती व कृषि विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ट्रायकोकार्ड व पिवळे चिकट सापळे बनविण्याचे तंत्रज्ञान या विषयावर सात दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, प्रशिक्षणाच्या उद्घाटनवेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.जीवन कतोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकऱ्यांनी ट्रायकोकार्ड व पिवळे चिकट सापळे प्रशिक्षणातून तांत्रिक माहिती घेऊन उद्योग उभारणीसाठी समोर यावे, त्यांना जिल्हा प्रशासनातर्फे सर्वतोपरी मदत देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील स्ट्रॉबेरी लागवड केलेल्या क्षेत्राची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली व कामांचा आढावा घेतला.
रासायनिक कीटकनाशकाचा वापर वाढत असून त्याचे दुष्परिणाम होत आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये मित्र कीडीचे व चिकट सापळ्याचे महत्व आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन करून उत्पादन घेण्याकरिता शेतकऱ्यांनी पुढे यावे व जैविक निविष्ठांची निर्मिती करावी, असे प्रस्ताविकामध्ये डॉ. जीवन कतोरे यांनी सांगितले.


