पुलगाव येथे ठाकरे गटाकडून बसची तोडफोड करीत केला निषेध
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव सह विविध ठिकाणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निषेध नोंदविण्यात आला आहे. बुधवारी रात्री दरम्यान वर्धेच्या पुलगाव येथे ठाकरे गटाकडून बसची तोडफोड करण्यात आली आहे.
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आशिष पांडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली. दगडफेक करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. पुलगावच्या स्टेशन चौक परिसरात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन केले गेले.बसला थांबवत त्यावर दगडफेक करन्यात आली. बसच्या तोडफोडीनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते घटनास्थळावरून पसार झाले. घटनेनंतर पुलगावच्या स्टेशन चौक परिसरात काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ही बस पुलगाव बस स्थानकावरून आगारामध्ये जात असल्याने बसमध्ये कोणतेही प्रवासी नव्हते या घटनेनंतर पुलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत करत आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या छायाचित्रांचे दहन

– वर्ध्याच्या बजाज चौक परिसरात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाराष्ट्रातील आमदार अपात्रता प्रकरणात पक्षपाती निर्णय दिल्याचा निषेध करण्यात आला.यावेळी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या छायाचित्रांचे दहन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी एकतर्फी निर्णय दिल्याचा आरोप करीत शिवसैनिक बजाज चौक येथे एकत्र आले. शिवसैनिकांनी रस्त्यावर बसून सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. निष्ठावंत शिवसैनिक निहाल पांडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. हातात गद्दार असे लिहिलेले पोस्टर दाखवून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
नार्वेकरांच्या पोस्टर प्रतिमेला जोडे मारत आंदोलन



