सर्वशाखीय तेली समाज मेळाव्याचे वर्ध्यात आयोजन
वर्धा : वर्धा शहरात संत तुकाराम महाराज आणि त्यांचे शिष्य संत जगनाडे महाराज यांचे गुरुशिष्य स्मारक उभारण्यात यावे. यासाठी नगर परिषद, समाज बांधवासह आपण सर्वतोपरी सहकार्य करू! मात्र सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. ते वर्ध्याच्या नालवाडी स्थित अनुसया मंगल कार्यालयात झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय सर्वशाखीय तेली समाज मेळाव्यात बोलत होते. यावेळी मंचावर आमदार रामदास आंबटकर,नागपूरचे अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, काँग्रेस नेते शेखर शेंडे, प्रवीण हिवरे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, मुख्याधिकारी राजेश भगत, शिवसेनेचे रविकांत बालपांडे, अनिल देवतारे, सेलू नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, संताजी फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर चाफले मंचावर उपस्थित होते. श्री संताजी जगनाडे महाराज फाउंडेशनच्या वतीने उपवर – वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

पुढे बोलताना खासदार रामदास तडस यांनी तेली समाजाचे राजकारणात वर्चस्व निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. आपण केंद्रात मंत्रिपद मिळावे यासाठी केंदीय मंत्री नड्डा यांच्याकडे मागणी केली होती. पण त्यावेळी ते म्हणाले होते की देशाचे सर्वोच्च असलेले पंतप्रधान हेच तेली समाजाचे आहे. त्यामुळे तेली समाजाचे प्रतिनिधित्व होतच आहे, असे सांगितले. संताजी जगनाडे महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर चाफले यांनी वर्ध्यात मोठे संताजी महाराज सभागृह असले पाहिजे,त्यासाठी राज्यकर्त्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी करण्यात आली.यावर काँग्रेस नेते शेखर शेंडे यांनी आपण निवडून आल्यास आपल्या सूत गिरणी परिसरातील पाच एकर जागा या सभागृहाला देण्याचे आश्वासन शेखर शेंडे यांनी दिले आहे. राजकारणात समाजाचे प्रभुत्व निर्माण होण्याची गरज आहे, त्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी मेळाव्याच्या आयोजनाची प्रशंसा करीत उपवर वधूना शुभेच्छा दिल्या. आमदार रामदास आंबटकर यांनी राष्ट्रीय पातळीवर समाज बांधवांनी विचार करीत समाजाला दिशा देण्याचे आवाहन केले आहे.



