शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करण्याची केली मागणी
पंचनामे लवकर झाले नाही तर आगामी निवडणुकांवर टाकणार बहिष्कार
वर्धा: देवळीच्या विजायगोपाल परिसरातील तांबा या गावात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी पिकावर शेतकऱ्यांना भिस्त होती, ही भिस्त देखील या अवकाळी पाऊस आणि गारांच्या तडाख्याने हिरावली गेली आहे.

शेतकऱ्याचे हरबरा पीक काढणीला आले असताना गाराचा पाऊस झाल्याने हरबऱ्याचे गाठे शेतातच गळून पडले आहे. आधीच सोयाबीन पिकावरील येलो मोझ्याक रोगाची मदत मिळाली नाही, पीक विमा मिळाला नाही तर काहींना जाहीर करण्यात आलेल्या मदतीच्या रक्कमाच खात्यावर आल्या नाही, अशा परिस्थितीत गार पिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अद्याप कुठलाही कर्मचारी पंचनामे करायला गावात आले नसल्याने शेतकऱ्यांनी खंत व्यक्त करीत पुढील काळात निवडणुकांवर बहिष्कार टाकावा की काय असाच प्रश्न उपस्थित केला आहे. विजायगोपाल नजीकच्या तांबा गावात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येत आहे.


