तुळजापूर (दहेगाव) येथे जलद रेल्वे गाडीला थांबा
गावकऱ्यांनी विदर्भ राज्य आघाडीच्या नेतृत्वात केला जल्लोष
वर्धा : वर्ध्याच्या सेलू तालुक्यात येणाऱ्या तुळजापूर (दहेगाव) येथे जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी नागरिक विदर्भ राज्य आघाडीच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला बसले होते. शिक्षणासाठी दहेगाव येथून बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे थांबा अत्यावश्यक असल्याने शाळकरी विद्यार्थी देखील मोठ्या संख्येत या आंदोलनात सहभागी झाले. 27 जानेवारी पासून हे उपोषण सुरू करण्यात आले होते. 26 दिवसाच्या उपोषण आंदोलनानंतर 25 गावांच्या प्रवासाचा प्रश्न मार्गी लागला आहे. अखेर उपोषण आंदोलनाला यश आले आणि दहेगाव (तुळजापूर) येथे इंटरसिटी या गाडीला थांबा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळी इंटरसिटी ट्रेन या गावाच्या रेल्वे स्थानकावर थांबली. त्यामुळे नागरिकांनी गाडीचे स्वागत करीत जल्लोष केला आहे.



