किचन सेट वितरणाच्या योजनेत डी बी टी तत्वाला फासलाय हरताळ
घोटाळे करण्यासाठी डीबीटी तत्व ठेवले जाते बाजूला
आशिष इझनकर
वर्धा : वर्ध्यात बांधकाम कामगाराना किचन सेटचे वाटप इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून केले जात आहे. यासाठी पहाटे तीन वाजतापासून कामगार रांगा लावत किचन सेट मिळण्याची प्रतीक्षा करीत आहे. पण डी बी टी तत्वाला हरताळ फासत हे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप या वितरणात होताना दिसून येत आहे. पारदर्शक व्यवहारासाठी थेट कामगारांच्या खात्यावर लाभ देण्याचे निर्देश असताना डी बी टी तत्वालाच बाजूला सारले जात आहे. थेट बँक खात्यात लाभ या पद्धतीला हरताळ फासला जात आहे.ज्या देवळी तालुक्यातील इसापूर या ठिकाणाहून वाटप केला जात आहे, तेथे कुठल्याही सुविधा नसल्याचा आरोप कामगार संघटनांकडून करण्यात आला आहे. तर महामार्गावर याचे वाटप होत असल्याने येथे अपघाताची शक्यता देखील निर्माण झाली आहे.

राज्य इमारत आणि बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने बांधकाम कामगारांना किचन सेटचे वितरण करण्यात येत आहे. हे वितरण जिल्ह्यात एकाच ठिकाणी होत असल्याने कामगारांची चांगलीच गर्दी होत आहे. होत असलेले वितरण वर्धा-यवतमाळ मार्गालगत असलेल्या इसापूर येथील कामगारांच्या मध्यान्ह भोजनाच्या सेंट्रल किचनच्या शेजारी होत आहे. रस्त्यालगत होत असलेल्या या वितरणामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात होत असलेले वितरण एकाच ठिकाणी होत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शिवाय, योजनेचा लाभ घेण्याकरिता येत असलेल्या कामगारांना इतर तालुक्यातून आपली कामे सोडून तिकिटाचा खर्च करून यावे लागते. याचा त्यांना फटका बसतो.
जिल्ह्यात बांधकाम कामगारांची संख्या ही प्रचंड आहे. ‘किचन सेट वाटप’ एकाच ठिकाणी सुरू होते त्यामुळे तेथे हजारावर बांधकाम कामगारांची गर्दी निर्माण झाली आहे. यामुळे येथे प्रचंड गोंधळ उडाला .



