देशी वाणाच्या संरक्षणासाठी बिजोत्सव
सेवाग्रामच्या बिजोत्सवात नऊ राज्यातून शेतकरी प्रतिनिधी दाखल
वर्धा : जे पेरलं जातं तेच उगवतं… आणि त्यामुळेच चांगले पेराल तरच चांगलं उगवेल हे सत्य नाकारता येत नाही. उन्हाळा ,हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूत लागणाऱ्या देशी बियांचे ऋतुचक्र माहीत असणे तेवढेच आवश्यक आहे. पालेभाज्या , तृणधान्य, कडधान्य आणि वनस्पतीच्या देशी बियाण्यासाठी ऋतुचक्राची ओळख सध्या सेवाग्राम येथील शांती भवनात करून दिली जाते आहे. हेच ऋतुचक्र अनुभवायचं असेल तर मग सेवाग्राम गाठावे लागेल. येथील ऋतुचक्राची काढण्यात आलेली रांगोळी आकर्षण ठरते आहे, त्यामुळेच येथे पोहचलेल्यांना या ऋतुचक्राला आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यात अथवा सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही.

वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रम परिसरातील शांती भवन येथे शेतकऱ्यांच्या देशी बियाण्यांना संरक्षण मिळावे यासाठी बिजोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या बिजोत्सवात नऊ राज्यातून विविध प्रतिनिधी सेवाग्राम येथे सहभागी झाले असून विविध भाजीपाला,तृणधान्य व कळधान्याचे देशी बियाणे येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी देशी आणि पारंपरिक वाणाचे बियाणे महत्वाचे ठरते आहे, या बियाण्याला संरक्षित करण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याकडे बीज बँक तयार केली आहे. त्याचे प्रदर्शन देखील येथे आयोजित करण्यात आले आहे.
नई तालीमचे प्रभाकर पुसदकर यांनी या बिजोत्सवाच्या आयोजनात महत्वाची भूमिका बाजवली असून नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्न होत आहे. स्वावलंबी शेतीचे पुरस्कर्ते डॉ. जाजू यांचे मार्गदर्शन या बिजोत्सवाला मिळाले आहे.

29 ते 31 मार्च दरम्यान चालणाऱ्या या बीज उत्सवात नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांत विचारांचे सुदृढ बीज रुजवणे काळाची गरज आहे. यातच खरी स्वतंत्रता आहे असे मत नैसर्गिक शेतीचे अभ्यासक सुभाष शर्मा यांनी मांडले .
नैसर्गिक शेतीचे अभ्यासक सुभाष शर्मा , कर्नाटक राज्यातील मिलेट पदार्थ अभ्यासक राम बाबू , नई तालिम समितीच्या अध्यक्षा, पी. उषा राणी , द्रोणागिरी येथील बीज उत्पादक श्री राघवा , गुलाबराव मारोडे , शेती कायदे तज्ञ अभ्यासक अफसर जाफरी यांची उपस्थित राहून शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले.
शांती भवन येथे बिजोत्सवात वसंत फुटाणे यांनी लिहलेले “ सेंद्रिय शेती का व कशी करावी “ या पुस्तकांच्या सुधारित आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले.



