बुरशीजन्य रोगांना ठेवता येते लांब
वर्धा : विदर्भामध्ये कापूस पिकानंतर सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सोयाबीन पिकावर प्रामुख्याने खोडमाशी, चक्रीभुंगा, उंटअळी तसेच मागील वर्षी चारकोल रॉट, शेंगेवरील करपा व पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यामुळे सोयाबीन पिकावर येणाऱ्या कीड व रोग टाळण्याकरिता तसेच त्यांचे प्राथमिक अवस्थेत व्यवस्थापन होण्याकरिता पेरणी अगोदर बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्वाची ठरू शकते.
खोडमाशीसाठी उष्ण तापमान, जास्त आर्द्रता, जास्त पाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण पोषक असते. तसेच सोयाबीन पिकाच्या रोपावस्थेत जास्त पाऊस, जास्त आर्द्रता आणि शेतात पाणी साचल्यामुळे मुळकुज व खोडकुज या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. जमिनीमध्ये वास्तव्य करणार्या बुरशीमुळे पिकांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांचे व्यवस्थापन बुरशींनाशकाची बीजप्रक्रिया करून टाळता येते.

खोडमाशी व रस शोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केल्याने पीक किमान एक महिना सुरक्षित राहते. तसेच जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया केल्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते, रोपांची वाढ जोमाने होते, उत्पादनात वाढ होऊन जमिनीची सुपीकता वाढते.
बीजप्रक्रिया करतांना प्रथम रासायनिक बुरशींनाशक कार्बोक्झिन ३७.५ टक्के अधिक थायरम ३७.५ टक्के (संयुक्त बुरशींनाशक) ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे त्यानंनतर थायामेथोक्झाम ३० टक्के एफ.एस. या कीटकनाशकाची १० मिलि प्रती किलो बियाणे याप्रमाणात घेऊन बीजप्रक्रिया करावी. सर्वात शेवटी जिवाणू संवर्धक रायझोबियम जापोनिकम २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघडविणारे जिवाणू (पी.एस.बी.) २५ ग्रॅम बियाण्यास चोळून बीजप्रक्रिया करावी.



