दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचा दीक्षांत समारोह
एक हजार ७२१ विद्यार्थ्यांनी कुलपती दत्ता मेघे यांच्याकडून दीक्षा
वर्धा : ज्या मार्गाने आपण जात आहात तो मार्ग आव्हानात्मक आहे, मात्र तेवढाच सन्मान देणाराही आहे. वैद्यकीय क्षेत्रात ज्ञानार्जन करतानाच नवे शिकण्याची प्रबळ इच्छा कायम ठेवा, असे आवाहन भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या १५व्या दीक्षांत समारोहात विद्यार्थ्यांना केले. समारोहाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे होते.
विद्यापीठ सभागृहात आयोजित दीक्षांत समारोहात वैद्यकीय, दंतविज्ञान, आयुर्वेद, भौतिकोपचार, परिचर्या, औषध निर्माणशास्त्र, परावैद्यकीय शाखा आणि अन्य विद्याशाखेतील एक हजार ७२१ स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थ्यांनी कुलपती दत्ता मेघे यांच्याकडून दीक्षा प्राप्त केली.




