पक्षिनिरीक्षण मानवी जीवन उन्नत करणारे – जितीन रहमान
शहरपक्षी फलक अनावरण – पक्षिचित्र प्रदर्शनीला प्रतिसाद
वर्धा – आपल्या परिसरात असलेला पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला आनंद देतो. त्यातच पक्षी निरीक्षणाची आवड असेल तर त्यातून आपले व्यक्तिमत्व अधिक प्रसन्न आणि उन्नत होत जाते, असे उद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी पक्षी सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी काढले. बहार नेचर फाउंडेशन, वनविभाग आणि बोर व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सप्ताहाचे उद्घाटन पक्ष्यांच्या सान्निध्यात शहरपक्षी नीलपंखाच्या फलक अनावरणाने करण्यात आले.
बोर व्याघ्र प्रकल्प उपसंचालक कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित या उद्घाटन समारोहाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे उपवनसंरक्षक हरवीर सिंह लाभले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर, बहारचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर वानखेडे, उपाध्यक्ष दीपक गुढेकर, सचिव जयंत सबाने मंचावर उपस्थित होते. दि. ५ ते १२ नोव्हेंबर या काळात आयोजित या सप्ताहात विविध ठिकाणी पक्षी निरीक्षण व पक्षिचित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार आहे.



