अमरावती – वर्ध्याच्या आष्टी( शहीद ) तालुक्यातील थार गावातील शेतमजूर दीपक अभिमान कुळमेथे वय 31 राहणार थार हा युवक 28 नोव्हेबर रोजी थार गावातून अमरावतीच्या नांदगाव पेठ येथील एमआयडीसी परिसरात काम करण्यासाठी गेला होता. दिनांक 29 रोजी नांदगाव पेठ येथील एमआयडीसी परिसरातल्या खांबावर रंगकाम करण्यासाठी तो चढला होता. रंगकाम करीत असताना झुल्याची हुक अचानक तुटली आणि तो जमिनीवर पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
सविस्तर असे की, आष्टी तालुक्यातील थार येथील शेतमजूर युवक आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मजुरीच्या कामाने अमरावती येथील कंत्राटदाराकडे गेला होता. सोमवारी गेल्यावर त्याने रात्रभर मुक्काम केला. दिनांक 29 रोजी कंत्राटदाराने सांगितलेल्या प्रमाणे कामावर हजर झाला. एमआयडीसी परिसरात असलेल्या हायमास्ट लाईटला रंग देण्यासाठी तो खांबावर चढला. व सोबत झूलाई होता. रंगकाम करीत असताना झुल्याची अचानक हुक तुटली आणि तो जमिनीवर पडला. डोक्याला मार लागल्याने रक्तस्राव झाला त्यात तो जागीच गतप्राण झाला. दीपक कुडमेते हा वरून खाली पडला सोबतच्या मित्रांनी त्याला अमरावती इर्विण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करताच दीपकला मृत घोषित केले. दीपक हा मनमिळावू स्वभावाचा युवक होता. दोन वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. घरचा करता पुरुष असल्याने त्यांच्यावर त्यांच्या पूर्ण परिवाराची जबाबदारी होती. दीपक कुडमेते यांच्या अपघाती मृत्यूने थार गावात हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मागे आई वडील भाऊ बहीण व पत्नी असा परिवार आहे.

