वर्धा : शेतीच्या बाजूला असलेल्या नाल्याला पावसाळ्यात येणारे पाणी शेतकर्यांसाठी नुकसानकारक ठरायचे. दरवर्षी नाल्याकाठची शेत जमीन खरडून पिकांचे नुकसान होत होते. ही बाब शेतकर्यांनी सरपंचांच्या माध्यमातून जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेच्या निदर्शनास आणून दिली. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने लोक सहभागातून खोलीकरणाचा विडा उचलला. काही दिवसात काम पूर्ण झाले आणि नाला खोलीकरणामुळे शेतीशिवार पाणीदार झाले. सिंचनाच्या कोल्हापूरी बंधाऱ्याला चाळीस गेट बसवून पाणी थांबण्यास मदत झाली आहे.

समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथे वाघाडी आणि शिंगाडी असे दोन नाले आहे. जवळपास पंचवीस वर्षांपूर्वी या नाल्यावरती कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. पण त्यानंतर दोनच वर्षात बंधार्याच्या फळ्या गायब झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा बंधारा अडचणीचा झाला होता. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत होता. ही बाब गावकऱ्यांनी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेला सांगितली. नाल्याच्या काठावर शेती असलेल्या शंभर ते दीडशे शेतकर्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सर्वांनी लोकवर्गणीत सहभाग नोंदवत नाला खोलीकरणासाठी पुढाकार घेतला. लोकसहभाग आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने नाला खोलीकरण करण्यासोबतच बंधार्याला फळ्या लावल्या. जानकीदेवी बजाज संस्थेचे विश्वस्त संजय भार्गव यांनी तर शेतकऱ्यांना आणखी त्या परिसरात कोल्हापुरी बंधारे पुरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न चालविले आहे.

चार किलोमीटर लांबीच्या वाघाडी नाल्याचे दोन किलोमीटर अंतरापर्यंत खोलीकरण करण्यात आले. १५ मीटर रुंदीकरण, नाला १ ते दीड मीटर खोल करण्यात आला. नाल्यातील निघालेला गाळ काठाने पसरविल्याने शेतीला मदत झाली. बंधार्याला फळ्या लावल्यानंतर दुर अंतरापर्यंत पाणी थांबले. त्यामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढली. सोबतच अनेकांना नाल्यातून पाणी घेण्यास मदत झाली. बंधारा फळी लावणे, खोलीकरण याकरिता १० लाख रुपये संस्थेने खर्च केले असून लोकांचाही याकरिता सहभाग मिळाला. आता शेतकऱ्यांनाही याचा फायदा होऊ लागला आहे. शेतकरी रामभाऊ चौधरी यांनी तर याच नाल्यातील पाण्यामुळे चना आणि गहू ही पिके वाढवली आहे.

नाल्याच्या खोलीकरणाने आणि बंधाऱ्याला फळ्या लावल्यामुळे आता पाण्याची मुबलक सोय झाली आहे. शेतकऱ्यांना बारमाही सिंचनासाठी पाणी मिळाले असून हे पाणी शेतापर्यंत नेण्याकरिता महावितरणकडून विद्यूत पुरवठा करण्याची गरज आहे. महावितरणकडे अर्ज दिले आहेत. पण अद्यापही विद्यूत पुरवठा मिळाला नाही, असे शेतकऱ्यानी सांगितले. २५ वर्षापूर्वी या कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती झाली परंतु दोन अडिच वर्षातच त्याच्या सर्व फळ्या गायब झाल्या. त्यामुळे पाणी थांबत नव्हते. खोलीकरण नसल्याने पुराचे पाणी शेतीतून जात होते. बजाज ग्रामविकास संस्थेने मदत केली. नाला खोलीकरण करण्यासह बंधार्याला फळ्या लावल्या. मुबलक पाणी असल्याने आता इतर पिके घेण्यास मदत होत आहे. असेच शेतकरी गोविंद राम चौधरी म्हणाले.


