वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील जळगाव येथील राजेश डफर या शेतकऱ्यांने काळ्या गव्हाचे उत्पादन घेतले. विदर्भात या गव्हाचे पीक कमी प्रमाणात घेतले जात असले तरी या गव्हाचे फायदे खूप जास्त असल्याने नागरिक बाहेरून हा गहू विकत आणतात. या शेतकऱ्याने एक एकर शेतात 18 क्विंटल इतक्या काळ्या गव्हाचे उत्पादन घेतले आहे.

काळा गहू शरीरासाठी चांगला असल्याचे राजेश डफर या शेतकऱ्याने गुगल वर वाचले होते, या गव्हाचे फायदे मोठ्या प्रमाणात असल्याने त्याची लागवड करण्याची त्यांनी मानसिकता तयार केली आणि काळ्या गव्हाचे बियाणे कुठे मिळतात याचा शोध सुरू केला. या काळ्या गव्हाच्या पोळ्या खाल्ल्याने पोटाचे विकार होत नाहीत. बऱ्याच ठिकाणी विचारपूस केल्यानंतर त्यांना आकोट येथे हे बियाणे मिळाले.त्यांनी सुरवातीला 40 किलो बियाणे आणून त्याची एक एकर शेतीमध्ये पेरणी केली. आश्चर्य म्हणजे एक एकरात त्यांना 18 क्विंटल काळ्या गव्हाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज आहे. काळ्या गव्हाला बाजारात 70 रुपये किलो दर असल्याचे शेतकरी राजेश डफर संगतात.

काय आहेत काळ्या गव्हाची वैशिष्ट्ये? –
काळा गहू बहुगुणी असून कॅन्सर, मधुमेह, ताणतणाव, हृदयरोग, स्थूलता अशा अनेक व्याधींमध्ये उपयुक्त आहे. याशिवाय काळ्या गव्हामध्ये अँटीऑक्सिडंट्स, बी जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड, सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅंगेनीज, जस्त, कॅल्शियम, लोह, तांबे, पोटॅशियम, फायबर आणि अमिनो अॅसिड असतात, त्यामुळे या गव्हाचे पोषणमूल्य अधिक आहे. समृद्ध पौष्टिक व सकस आहारात त्याचा समावेश करता येतो. अॅन्थोसायनीन (१४० पीपीएम) या घटकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हा गहू काळा असतो. अॅन्थोसायनीन हे अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजेच ते रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे आहे. ब्लूबेरी, जांभूळ या फळांमध्ये अॅन्थोसायनीनचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे या फळांचा रंग काळपट जांभळा असतो.

अॅन्थोसायनीनमुळे फळांची पौष्टीकता वाढते. परंतु जांभूळ आणि ब्लूबेरी वर्षभर उपलब्ध नसतात. काळ्या गव्हामुळे ही पौष्टीकतत्वे रोजच्या आहारातून अगदी सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकतात.त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील या शेतकऱ्यांने काळ्या गव्हाची लागवड करून आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नातुन चांगली कमाई केली आहे.


