वर्धा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला जात आहे. या प्रकल्पातून सामुहिक व वैयक्तिक लाभाच्या योजना देखील राबविल्या जातात. सेलू तालुक्यातील शिवणगाव येथील एका महिलेने यातील वैयक्तिक लाभाच्या योजनेचा फायदा घेत आपला स्वत:चा बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरु केला. या व्यवसायातून या महिलेच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे.
शेळीपालनाचा व्यवसाय आत्मविश्वासाने सुरु करण्याऱ्या या महिलेचे नाव प्रतिभा नंदकिशोर गेडाम असे आहे. भुमीहीन असतांना देखील न डगमगता त्यांनी हिमतीने आपल्या शेळीपालनात भरारी घेतली आहे. कृषी संजीवनी प्रकल्पात महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रकल्प गावामध्ये महिला कृषि मित्र म्हणजे कृषी ताईंची नेमणूक करण्यात आली आहे. शिवणगावच्या कृषी ताई वैशाली रायफुले यांनी प्रकल्पातील सामुहिक व वैयक्तिक लाभाच्या योजनेबाबत प्रतिभा गेडाम यांना सांगितले. वैयक्तिक योजनेच्या लाभांतर्गत बंदिस्त शेळीपालनकरिता त्यांचा अर्ज दाखल करून घेतला होता.
त्यानंतर त्यांना उमेद अंतर्गत महिला स्वयं सहाय्यता गटाकडून 80 हजाराचे कर्ज प्राप्त झाले. या पैशातून त्यांनी 10 बकरी व 1 बकरा खरेदी केला आणि आपल्या बंदिस्त शेळीपालनास सुरुवात केली. यासाठी त्यांना उमेदकडून 36 हजार 938 रुपयांचे अनुदान देखील प्राप्त झाले. या अनुदानातून त्यांनी बचतगटाचा कर्जाचा हप्ता भरला. शेळीपालन व्यवसायातून आतापर्यंत त्यांनी 6 शेळ्या, 4 बोकड व लेंडीखत विकून चांगले उत्पन्न मिळविले आहे.
आज रोजी प्रतिभा गेडाम यांच्या बंदिस्त शेळीपालनामध्ये 9 पिल्ले व 15 मोठ्या शेळी असे संसाधन उपलब्ध आहे. उपलब्ध साधनांचा योग्य पद्धतीने लाभ घेऊन हवामान बदलाच्या प्रतिकुल परिस्थितीमध्ये अनुकुल असे उपजिविकेचे साधन निर्माण करुन प्रतिभाताईंनी इतर महिलांसमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य निर्माण होऊ शकले, असे त्या सांगतात.


