वर्धा : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत केलेल्या अपमानकारक विधानाचा निषेध करण्यासाठी भाजप एकवटली आहे. हिंगणघाट शहरात निघालेल्या सावरकर गौरव यात्रेत आमदार समीर कुणावार यांच्या जोडीला खुद्द काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी उद्योग राज्यमंत्री उभे राहिले. दोन्ही नेते यात्रेत पायदळ चालताना नागरिकांच्या भेटी घेत होते. दरम्यान गोकुलधाम मैदानावर झालेल्या सभेत आमदार समीर कुणावार चांगलेच कडाडले. राहुल गांधी यांनी सावरकरांचा पुन्हा अपमान केला तर अख्खा महाराष्ट्र विरोधासाठी उभा ठाकेल, असाच बुलंद आवाजातील इशारा आमदार कुणावार यांच्या भाषणात होता. समीर कुणावार यांनी सावरकर यांच्या पुस्तकांचे आजच्या पिढीने अध्ययन करावे असे आवाहन केले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजार स्थळापासून सावरकर गौरव यात्रेला सुरवात झाली. या यात्रेत मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा व जीवनाचा परिचय व्हावा यासाठी हिंगणघाट शहरात भारतीय जनता पक्षाकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली.

या गौरव यात्रेत हिंगणघाट येथील आमदार समीर कुणावर, शिंदे गटाच्या शिवसेनेत दाखल झालेले माजी उद्योग राज्यमंत्री अशोक शिंदे, वर्ध्याचे माजी खासदार सुरेश वाघमारे या गौरव यात्रेत सहभागी झाले. हिंगणघाट शहरातील मोहता हायस्कूल, कारंजा चौक, सुभाष चौक, आंबेडकर चौक मार्गे गोकुलधाम मैदानापर्यंत पोहचली. भजन, ढोल, पताका आणि भगव्या व तिरंगा झेंड्यासह यात्रेत महिला व पुरुष हजारोच्या संख्येत या गौरव यात्रेत सहभागी झाले आहे. मैदानात झालेल्या सभेत भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी सावरकरांचा इतिहास मांडला. हजारोच्या संख्येत नागरिक सहभागी झाले होते.


