वर्धा ते कळंब रेल्वेगाडीत प्रवासी नाही
प्रवाश्यांमध्ये अद्याप गाडीची माहितीच पोहचली नाही
वर्धा (ब्युरो) : दहा रुपयांच्या तिकिटात वर्ध्याहून कळंब येथे रेल्वेने पोहचता येत असले तरी सध्या नव्याने सुरू झालेल्या या गाडीला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. दोन लोको पायलट, एक गार्ड आणि गेटमनच्या साहाय्याने कळंबच्या दिशेने जाणारी ही ट्रेन रिकामीच धावत असल्याचे चित्र आहे.
वर्धा ते नांदेड या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे, पण याच मार्गात वर्धा ते कळंब पर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. याचे ई लोकार्पण 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथून करण्यात आले. वर्धा ते कडंब दरम्यान पहिली लोकल रेल्वे गाडी सुरू करण्यात आली. ही रेल्वे सकाळी 8 वाजता वर्धा रेल्वे स्थानकावरून कलंब साठी निघत आहे. पण सध्यातरी यात बसायला प्रवासी तयार नाही. एकतर वर्धा ते कळंब हा 42 किलोमीटर इतका कमी अंतराचा प्रवास आणि या मार्गावर जेथे रेल्वे स्थानके उभारण्यात आली ते ठिकाण गावापासून लांब आहे. देवळी , भिडी आणि कळंब ही रेल्वे स्थानके मार्गात येत आहे. पण येथे उभारलेली रेल्वे स्थानके गावापासून एक ते दोन किलोमीटर लांब आहे. स्थानकावर येणाऱ्यांची संख्या जास्त नसल्याने शेअरिंग आटो देखील उपलब्ध नसतो, त्यामुळे रेल्वेने वर्ध्याहून कळंब ला जाणे जिकिरीचे आहे.

सध्या दहा डब्यांची लोकल गाडी डिझेल इंजिनच्या साहाय्याने 42 किमी अंतराचा टप्पा पार करीत कळंब येथे पोहचते. सकाळी आठ वाजता वर्ध्यातून निघालेली गाडी कळंब येथे सव्वानऊ वाजताच्या दरम्यान पोहचत आहे तर दहा वाजता परत ती वर्ध्याच्या दिशेने रवाना होत आहे. लोको पायलट जी. एस. रोडे आणि सहाय्यक लोको पायलट रुपेश मानकर हे याचे चालक आहे. दहा रुपयाच्या तिकिटात वर्ध्याहून कळंब येथे पोहचणे शक्य असले तरी, अद्याप गाडी रिकामीच धावत असल्याचे चित्र आहे. देवळी आणि भिडी या दोन स्थानकावरून देखील फारसे कुणी या गाडीमध्ये बसले नाही. सध्या तरी गाडीची एकच फेरी पूर्ण केली जात आहे.

देवळी, भिडी आणि कळंब रेल्वे स्थानकावर तिकीट घराशिवाय पिण्याचे पाणी आणि शौचालय उपलब्ध आहे. सध्यातरी कुणी फेरीवाला स्टेशनवर अथवा गाडीमध्ये आढळून आला नाही. खासदार रामदास तडस यांनी कळंब येथून या गाडीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. हाच शुभारंभ वर्ध्यातून करण्यात आला असता अथवा वर्ध्यात या गाडीचे स्वागत करण्यात आले असते तर त्याचा प्रचार प्रसार झाला असता अशा प्रतिक्रिया भिडी येथील एका प्रवस्याने दिली. चार ते पाच प्रवासी घेऊन ही गाडी कळंब च्या दिशेने जाताना दिसते, यवतमाळ पर्यत या मार्गाचे काम पूर्ण झाले असते आणि त्यानंतर या मार्गाचे लोकार्पण होऊन पुढे ही गाडी सुरू करण्यात आली असती तर वर्धा आणि यवतमाळ या दोन जिल्हा स्थळांना जोडणारी ही गाडी ठरली असती. लोकार्पण करण्याची घाई करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया देखील येथील प्रवास्यामध्ये होती.
अद्याप पुलाची उभारणी नाही



