आर्वी विधानसभेतील शेतकर्यांसाठी 24 तास वीज; 16 नवीन सौर प्रकल्प
आर्वी : आर्वी विधानसभा मतदार संघातील बहुतांश शेती जमीन जंगलाला लागून आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा मोठा त्रास शेतकर्यांना होता. जंगली श्वापदांनी अनेक शेतकरी, शेतमजुरांना ठार मारले. अनेकांना जायबंदी केले. शेकडो जनावरांचा फडशा पाडला. त्यामुळे शेतकर्यांना ओलीतासाठी रात्री 12 तास वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकर्यांनी लोकसभा प्रमुख सुमीत वानखेडे यांच्याकडे केली होती. राज्य सरकारही शेतकरीहितार्थ असल्याने शेतकर्यांच्या मागणीचा विचार करून आता 24 तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सौरउर्जेच्या माध्यमातून आर्वी विधानसभा मतदार संघातील 21 हजार शेेतकर्यांना या संबंधात मुख्यमंत्री सौर उर्जा कृषी योजनेंतर्गत आर्वी उपविभागतील 16 उपकेंद्रावर सौर उर्जेच्या माध्यमातून शेतकर्यांना 12 तास वीज उपलब्ध होणार असुन त्याचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले असल्याचे सुमीत वानखेडे यांनी कळवले आहे.
आज 7 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सौर प्रकल्प उभारण्याबाबत विकासकांना कार्यादेश विरतण सह्याद्री राज्य अतिथीगृह मुंुबई येथे देण्यात आले.
आर्वी उपविभागात मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे रात्री सिंचनासाठी शेतात जाताना वन्यप्राण्यांपासुन असलेल्या धोक्यामुळे शेतकर्यांना शेती करणे अवघड झाले होते. आता दिवसा वीज उपलब्ध होणार असल्यामुळे शेतकर्यांना रात्री शेतात जाऊन ओलीत करावे लागणार नाही. परिणामी, शेतकर्यांची अनेक वर्षांची मागणी या निमित्ताने पुर्ण होणार आहे.
शेतकर्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होते. जेथे वापर तेथेच वीजनिर्मिती या पद्धतीने डिस्ट्रिब्युटेड स्वरुपात सौर ऊर्जेचा वापर करून कृषी फीडर चालविण्याची ही योजना आहे. आधीच्या योजनेमध्ये आमूलाग्र परिवर्तन करून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 एप्रिल 2024 मध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सुरू करण्यात आली.
योजनेच्या घोषणेपासून केवळ 11 महिन्यांमध्ये 9 हजार मेगावॅट सौर ऊर्जानिर्मितीचे प्रकल्प खुल्या निविदा पद्धतीने आणि किफायतशीर दरात अंतिम केले आहेत. त्यापैकी 7 हजार 663 मेगावॅटच्या प्रकल्पांसाठी विकासकांना आज कार्यारंभ आदेश देण्यात आले. प्रत्येक प्रकल्प 18 महिन्यांमध्ये उभारले जाणार आहेत.
या प्रकल्पांतर्गत शेतकर्यांसाठी सौर ऊर्जा अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध होणार आहे.
शेतकर्यांना दिवसा वीज मिळेलच, सोबत राज्य सरकारची दर वर्षी 2 हजार कोटी रुपये सबसिडी वाचेल. सौर ऊर्जानिर्मितीसाठी 18 हजार 84 एकर जमीन उपलब्ध करण्यात आली. या योजनेमुळे ग्रामीण भागात 20 हजार रोजगार निर्माण होतील.
महावितरण द्वारे आयोजित कार्यक्रमाला मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र तसेच संचालक वाणिज्य योगेश गडकरी यांच्या हस्ते नाकॉएफ उर्जा प्रा. लि. या कंपनीस कार्यारंभ आदेश देण्यात आले.
27 पैकी 21 हजार शेतकर्यांना दिलासा
आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यात 26 हजार शेतकरी आहेत. त्यापैकी 21 हजार शेतकर्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. अनेक वर्षांपासुन शेतकरी मागणी करीत होते त्या मागणीचा क्रांतिकारी निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. शेतकर्यांची मोठी समस्या या योजनेमार्फत सुटणार आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम आर्वी उपविभागातील शेतकर्यांना प्राधान्य दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे लोकसभा निवडणुक प्रमुख सुमीत वानखेडे यांनी आभार मानले.


