पावसाळ्यात उद्भवणा-या आजाराबाबत आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन
जिल्हा आरोग्य अधिका-यांनी दिल्या सूचना
वर्धा : पावसाळा हा विविध आजारांना निमंत्रण देणारा ऋतु म्हणुन ओळखला जातो. पावसाळ्यात हवेतील आद्रतेमुळे विषाणु वाढतात त्यामुळे पाणी, अन्न पदार्थ दुषीत होण्याची शक्यता अधिक असते. तसेच गढूळ पाणी, पाला पाचोळा कुजल्यामुळे डासासह विविध प्रकारचे जिवाणू सुध्दा निर्माण होतात. त्यामुळे मानवाला पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे किटकजन्य आजार डेंगु, हिवताप, चिकुण गुण्या सारखे आजार तसेच दुषित पाण्यामुळे कॉलरा, अतिसार, काविळ, विषमज्वर यासारखे आजार उद्भवतात. तसेच पावसाळ्यामध्ये लेप्टोस्पायरा या जंतुची जखमेवाटे लागण होऊन लेप्टोस्पायरोसीस हा आजार होतो. सारखे आजारापासुन खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात नदी, नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरी जिवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. दुषीत पाण्यामुळे रोगराई व आरोग्यच्या समस्या होवू शकतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला असून यासह विविध उपाययोजना सुध्दा सुचविलेल्या आहे.
पावसाळ्यामध्ये होणारे आजार
डेंग्यु – डेंग्यु हा आजार एडीस इजिप्ती डासापासुन होणारा आजार आहे. पाऊस पडून गेल्यावर साचलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये या डासाची उत्पत्ती होते व डासाच्या चावल्यामुळे हा आजार होतो. यामध्ये ताप, अंगावर पुरळ येणे, रक्तातील प्लेटलेटचे प्रमाण कमी होणे व अशक्तपणा थकवा जाणवणे यासारखी लक्षणे जाणवतात.
जलजन्यआजार – पावसाळ्यामध्ये दुषीत पाणी पिल्याने अतिसार, कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ विषमज्वर, लेप्टोस्पारासीस यासारखे आजार सुध्दा होतात.
आजार टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी
वैयक्तिक स्वच्छतेसह परीसर स्वच्छ ठेवावा, घरासभोवतालच्या परीसरात पाणी साचु देऊ नये, डासाचा प्रादुर्भाव होणार नाही. याची दक्षता घ्यावी. आठवड्यातुन एक दिवस कोरडा पाळावा, ताजे अन्न खावे, उघड्यावरील अन्न खावु नये, पाणी गाळून दैनंदिन निर्जंतुक केलेले पाणी प्यावे, कोणत्याही आजाराची लक्षणे आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आरोग्य उपकेंद्राशी सपंर्क साधावा.
जिल्ह्यामधील 32 आरोग्य केंद्रामध्ये साथरोग विषयक औषधाचा पुरवठा करण्यात आला असुन वैद्यकिय मदत पथक स्थापन करण्यात आले आहे. सर्व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 24 तास साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले असुन सर्व आरोग्य संस्थांना सतर्क राहण्याच्या सुचना जिल्हा आरोग्य अधिका-यांनी दिलेल्या आहे, असे आरोग्य विभागाच्यावतीने कळविले आहे.
Post Views: 203